संमेलनाध्यक्षपद निवडणुकीत मतदार ठरविण्याचे निकषच नाहीत
राष्ट्रपती असो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष दोघांचीही निवड करताना लांबलचक निवडणूक प्रक्रिया राबवली जात असली तरी अध्यक्षाला
निवडून देणाऱ्या मतदारांसाठी मात्र, विदर्भ साहित्य संघाकडे कोणताही निकष नाही. मतदार किमान साहित्यिक असावेत, अशी इतर साहित्यिकांची अपेक्षा असताना साहित्याची सेवा करणारा मग तो कुणीही असावा, अशी विदर्भ साहित्य संघाची भूमिका आहे.
साहित्याशी तीळमात्र संबंध नसल्याचे संमेलनासाठी मतदानाचा अधिकार मिळालेले मतदारच सांगतात. ‘लोकसत्ता’शी बोलताना अनेक मतदारांनी याची प्रांजळ कबुली दिली.  ‘साहित्याशी माझा काहीही संबंध नसून चंदूभाऊने सदस्य केले म्हणून मतदारयादीत नाव आल्याचे माजी नगरसेवक प्रमोद पेंडके यांनी सांगितले तर त्यांचे भाऊ चंद्रकांत पेंडके यांनीदेखील त्यांचे साहित्यात फार काही योगदान नसल्याचे स्पष्ट केले. राजीव कृष्ण देशपांडे हे स्वत: चार्टर्ड अकाउंटन्ट असून त्यांचा साहित्याशी संबंध नाही.
साईंटिफिक सोसायटीचे पदाधिकारी असलेल्या सुनील बाळकृष्ण अलोणी यांचा वाचनापलीकडे साहित्याशी अर्थाअर्थी संबंध नाही. मात्र, विलास मानेकर यांच्या ओळखीने मतदारयादीत जागा मिळाल्याचे अलोणी यांनी सांगितले. विदर्भ साहित्य संघाचे दिवाणजी म्हणून ओळखले जाणारे प्रदीप मोहिते यांची प्रामाणिक प्रतिक्रिया अशी की २५ वर्षे विदर्भ साहित्य संघाची पर्यायाने साहित्यिकांची सेवा केली हेच योगदान समजून मतदारयादीत नाव आले. सुरेश पारळकर हे छायाचित्रकार विदर्भ साहित्य संघाचे आजीवन सदस्य आहेत. मतदार म्हणून स्वत:ची पात्रता स्पष्ट करताना त्यांनी त्यांचे आजोबा आणि काका साहित्यिक असल्याचे सांगितले.
नाथे अकादमीचे संचालक संजय नाथे यांनी भरपूर साहित्य संपदा निर्माण केल्याचा दावा केला आहे. ‘स्पर्धा परीक्षा’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’, ‘व्यसनमुक्ती’वर प्रचंड लिखाण केल्याचे त्यांनी म्हटले असून ताबडतोब पुस्तकही ‘लोकसत्ता’ कार्यालयाला पाठवले. अरविंद पुराणिक यांनी प्रामाणिकपणे मराठी साहित्यात काहीही योगदान नसल्याचे मान्य करून मतदारयादी नाव येण्यासाठी कधीही प्रयत्न न केल्याची माहिती दिली. मात्र, सोबतच त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या उदारमतवादी धोरणाचीही ओळख करून दिली. वर्ष २००७च्या संमेलनाचे यजमानपद विदर्भ साहित्य संघाने स्वीकारल्यानंतर विविध समित्यांची स्थापना करण्यात येऊन ज्यांची त्या समित्यांवर वर्णी लागली त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांना मतदार बनवण्यात आले. त्यात डॉ. विनय वैद्य आणि अजित प्रभाकर दिवाडकर यांचीही नावे असल्याचे पुराणिक म्हणाले. मृत्यू पावलेले एक ‘सप्तक’मधून वगळता विलास मानेकर, उदय पाटणकर, उदय गुप्ते, प्रदीप मुन्शी, अरुण पोळळी आणि श्रीराम काणे यांचाही मतदारयादीत समावेश आहे.
भाग्यश्री बनहट्टी यांनी श्री सूर्या टाईम्स पाक्षिकात स्तंभ लेखनापलीकडे साहित्यात फारसे योगदान नसल्याचे मान्य केले आहे. त्यांचे दीर मंदार बनहट्टी आणि सासरे श्रीकृष्ण बनहट्टी यांचेही नाव मतदारयादीत असून त्यांचा साहित्याशी संबंध नाही, अशी कबुलीही भाग्यश्री यांनी दिली.
‘नारायण ऑफसेट’ नावाने त्यांची प्रिंटिंग प्रेस असून सर्व कुटुंबीय तेच काम पाहतात. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांनी साहित्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगून फुकट फौजदारांच्या यादीत नाव नको म्हणून कटाक्षाने साहित्य व्यवहार टाळतो, अशी प्रतिक्रया व्यक्त केली.
  संस्थेला जे जवळचे वाटतात.
     ते मतदार होतात – म्हैसाळकर
विदर्भ साहित्य संघाची भूमिका स्पष्ट करताना अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर म्हणाले, मीसुद्धा साहित्यिक नाही. तरी लोकांनी गेली कित्येक वर्षे अध्यक्ष बनवले आहे. मी साहित्य क्षेत्राची सेवा करणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मतदार कोण असावेत याविषयी कोणतेही प्रमाण ठरविण्यात आलेले नाहीत. मतदारयादीत २५ लोक तर कार्यकारिणीचे असतात. संस्थेला जे जवळचे वाटतात. ते मतदार होतात. साहित्यिकांचे राजकारण, हेवेदावे कार्यकर्त्यांमध्ये नसतात. त्यांना काही स्वत:ला मिरवून घ्यायचे नसते. परिसंवाद किंवा कविसंमेलनातही भाग घ्यायचा नसतो. कार्यकर्त्यांची बूज राखली पाहिजे, या मताचा मी आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याचे साहित्यिक मूल्यमापन त्याने साहित्याला दिलेली सेवा या निकषावर केले जाते.