विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस मानून या दिवशी व्हेरायटी चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे यासाठी विदर्भवाद्यांनी पुन्हा जोरदार कंबर कसली असून विदर्भ राज्य आंदोलन समितीव्दारे आंदोलन करण्याचे घोषित केले आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन अधिक प्रखर व्हावे, यासाठी सर्व विदर्भवाद्यांनी एकत्र येऊनच रोखठोक भूमिका घेत विदर्भ राज्य आंदोलन समिती स्थापन केली आहे. यात सर्व विदर्भवादी संघटना व संस्था सहभागी झाल्या आहेत. या समितीव्दारे घोषित केलेल्या प्रत्येक आंदोलनाला विदर्भातील स्वातंत्र्यप्रेमी जनतेने जोरदार साथ द्यावी आणि स्वतंत्र विदर्भाचा लढा निर्णायक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती विदर्भ राज्य आंदोलन समितीव्दारे करण्यात आली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन विदर्भ राज्य आंदोलन समिती काळा दिवस मानून या दिवशी व्हेरायटी चौकात सायंकाळी ५ ते ६ या वेळात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कार्यकर्ते काळी फीत लावून विदर्भावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करणार आहेत. यानंतर या चौकातून कॅन्डल मार्च निघणार असून सर्व विदर्भवादी त्यात सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे आणि विदर्भातील जनतेला न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात माजी आमदार अॅड. वामनराव चटप, आमदार डॉ. अनिल बोंडे, किशोर पोतनवार, दीपक निलावार, अरुण केदार, श्रीनिवास खांदेवाले, नंदा पराते, सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक प्रबिरकुमार चक्रवती, राम नेवले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बोके, रेवतकर, दीपक गोतमारे, प्रकाश केने, जगदीश बोंडे इत्यादींसह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी व्हावे आणि संपूर्ण विदर्भात हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळून निषेध नोंदवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आज धरणे
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस मानून या दिवशी व्हेरायटी चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
First published on: 01-05-2014 at 12:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha statehood activists committee hold protest today