अतितीव्र उन्हाचा तडाखा अनुभवणाऱ्या विदर्भाला आता मान्सूनचे वेध लागले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ३ जूनला मान्सूनचे केरळात आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात विदर्भातही दणकून पाऊस पडेल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव आणि बंगालचा उपसागर ओलांडून मान्सूनने केरळच्या किनारपट्टीवर धडक दिल्यास मुंबईच्या किनारपट्टीवर त्याचे आगमन वेळेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मान्सूनने २० मे ते २५ मे दरम्यान कोणताही प्रगती दाखविली नव्हती. परंतु, २६ आणि २७ मे नंतर तो पुढे सरकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मान्सूनच्या केरळातील आगमनावरच त्याचे विदर्भातील आगमन अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस वेळेवर पडेल, अशी अटकळ बांधली जात आहे.
यंदाच्या वर्षी भारतात सरासरी चांगला पाऊस पडण्याचे भाकीत वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मशागती, नांगरणीची कामे आटोपून पेरणीची प्रतीक्षा आहे. विदर्भात गोंदिया जिल्ह्य़ाला वादळी पावसाने अचानक तडाखा दिला. वादळामुळे तिरोडा तालुक्यात जबरदस्त नुकसान झाले आहे. शेकडो घरे उद्ध्वस्त झाली असून दिली जाणारी नुकसानभरपाई अत्यंत तोकडी असल्याने पुढील पावसाच्या वेळी काय होणार, याची धास्ती बसली आहे. अमरावती जिल्ह्य़ातही मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. सोसाटय़ाच्या वाऱ्याने धुमाकूळ घातल्याने अनेक वृक्ष कोसळले, अनेक जिल्ह्य़ातील अनेक गावांना अवेळी वादळाचा तडाखा बसला.
गेल्या काही दिवसांपासून नागपूरचे वातावरण किंचित ढगाळलेले दिसू लागले असून नव तपाची धास्ती आता कमी झाली आहे. यंदाचे तापमान तब्बल ४८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने चंद्रपूर आणि नागपूरकरांना नव तपाच्या काळात पारा आणखी उच्चांक गाठेल, अशी दहशत वाटू लागली होती. प्रत्यक्षात तापमान किंचित कमी झाले आहे. परंतु, उकाडय़ाने पाठ सोडलेली नाही. चंद्रपूरला ओपन कास्ट खाणी आणि विद्युत प्रकल्पांमुळे यंदा ४८.२ एवढा तापमानाचा अभूतपूर्व उच्चांक नोंदविला गेला. त्यामुळे पहिला पाऊस जूनच्या पहिल्या आठवडय़ात आल्यास वातावरणातील दाह थोडा कमी होऊ शकेल, या प्रतीक्षेत लोक आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा