लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील दहापैकी पाच ते सहा मतदारसंघात दुहेरी आणि तिहेरी लढत असली तरी जोपर्यंत बहुजन समाज पक्षाचे उमेदवार जाहीर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार नाही. गेल्या  निवडणुकीत दहापैकी सात मतदार संघात बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली होती. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि अमरावती मतदार संघात तिहेरी लढती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार नाना पटोले यांच्यामध्ये चांगलीच लढत होणार आहे. या मतदार संघावर पटेल यांचे आजपर्यंत वर्चस्व राहिले असले तरी भाजपने चांगली लढत दिली आहे. गेल्या निवडणुकीत नाना पटोले बंडखोर उमेदवार म्हणून लढले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पटोले हे कुणबी समाजाचे नेते असून या भागात समाजाचे मतदार मोठय़ा प्रमाणात आहेत. शिवाय मधल्या काळात अनेक आंदोलने पटोले यांच्या नेतृत्वात झाली. आम आदमी पक्षाने प्रशांत मिश्रा या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली असली तरी आपचा प्रभाव या भागात फारसा दिसत नाही. मिश्रा हे मूळचे भंडारातील असले तरी गेले अनेक वर्ष ते अमेरिकेत एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होते. तेथील नोकरी सोडून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बसपाने सक्षम उमेदवार दिला तर या ठिकाणी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे, अन्यथा पटेल आणि पटोले यामध्ये चुरशीची लढत बघायला मिळेल. गेल्या निवडणुकीत पटेल २ लाख ५१ हजार ९१५ मतांनी विजयी झाले होते.
चंद्रपूरमध्ये भाजपचे हंसराज अहीर आणि आपचे उमेदवार वामनराव चटप यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस आणि बसपाने या ठिकाणी उमेदवार जाहीर केला नाही. गेल्या निवडणुकीत नरेश पुगलिया यांचा अहीर यांनी ३२ हजार ४९५ मतांनी पराभव केला होता. वामनराव चटप यांना आपने उमेदवारी दिली असल्यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहे. चटप यांनी गेली निवडणूक स्वतंत्र भारत पक्षाकडून लढविली होती. चटप यांची भिस्त मोठय़ा संख्येत असलेल्या त्यांच्या समाजाच्या मतावरही आहे. काँग्रेसतर्फे पुगलिया यांना पुन्हा उमेदवारी दिली जाते की संजय देवतळेंना हे बघायचे आहे. या ठिकाणी काँग्रेस भाजप आणि आप अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली -चिमूर मतदार संघात भाजपने अशोक नेते यांच्यावर पुन्हा विश्वास टाकून त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी काँग्रेस, आप आणि बहुजन समाज पक्षाने उमेदवार जाहीर केले नाही. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे, बसपाचे राजे सत्यवानराव आत्राम आणि अशोक नेते यांच्यामध्ये लढत होती त्याच कोवासे यांनी सर्वाधिक ३ लाख ३१ हजार ७५६ तर त्या खालोखाल अशोक नेते यांनी २ लाख ९३ १७६ मते घेतली होती. बहुजन समाज पक्षाचे सत्यवानराव आत्राम यांनी १ लाख ३५ हजार ७५६ मते घेतली होती. काँग्रेसतर्फे पुन्हा मारोतराव कोवासे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. गडचिरोलीमध्ये भाजप,  काँग्रेस आणि बसपा अशीच सरळ लढत यावेळी बघायला मिळणार आहे.
अमरावतीमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत राणा यांच्यामध्ये लढत होणार आहे. आम आदमी पक्षाने भावना वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन समाज पक्षाने मात्र या ठिकाणी उमेदवार घोषित केलेला नाही. अमरावती मतदार संघावर गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेना- भाजपा युतीचे साम्राज्य राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावत यांच्याकडे अमरावतीची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. राणा यांना विरोध असल्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारार्थ फारसे उत्साहाने बाहेर पडतील, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. आपच्या भावना वासनिक या सामाजिक कार्यकर्त्यां असून त्यांना समाजाची मते मिळण्याची शक्यता आहे.  या ठिकाणी तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.
वध्र्यामध्ये अजूनपर्यंत एकाही राजकीय पक्षाने उमेदवार घोषित केला नाही. काँग्रेसने उमेदवार निवडण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला असून या ठिकाणी सागर मेघे आणि चारुलता टोकस यांच्यामध्ये निवडणूक झाली असून त्यात सागर मेघे विजयी झाले. त्यामुळे सागर मेघे यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित झाले असले तरी टोकस यांच्याकडून जोर लावला जात आहे. भाजपने रामदास तडस यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. रामदास तडस एकेकाळी दत्ता मेघे यांचे खास समर्थक समजले जात असताना भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर या ठिकाणी चांगली लढत बघायला मिळणार आहे. मेघे यांना उमेदवारी दिली तर टोकस आणि रणजित कांबळे यांची नाराजी त्यांना महागात पडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आप आणि बहुजन समाज पक्षाने या ठिकाणी उमेदवार जाहीर केला नाही. दहाही मतदारसंघात राजकीय चित्र  अस्पष्ट असले तरी काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिहेरी लढत बघायला मिळणार, असे सध्याचे चित्र आहे.     (उत्तरार्ध)

Story img Loader