मराठी भाषा विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण पत्र पुरेशा आधी न मिळाल्याने नाराज झालेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकाने पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला जाण्यास नकार दिला. पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. या सोहळ्याचे निमंत्रण सदर साहित्यिकाला २ जुलैला पाठविण्यात आले होते. परंतु, दोन दिवसात जाण्याची व्यवस्था करणे शक्य नसल्याने त्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. मात्र, असमाधानकारक उत्तरामुळे या सोहळ्यास जाणार नसल्याचे सांगून हा पुरस्कार येत्या २० जुलैपर्यंत आपल्याला सन्मानाने पाठविण्यात यावा, असे स्पष्ट शब्दात मंडळाला बजावले आहे.
उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी लेखकांना उत्तेजन देण्याच्या हेतूने राज्य शासन उत्तम पुस्तकास प्रौढ आणि बालवाङ्मय या विभागात विविध मान्यवरांच्या नावाचे पुरस्कार देत आहे. मराठी भाषा विभागांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून सदर पुरस्कार दिले जात आहेत. पूर्वी पुरस्काराच्या स्वरूपात १० ते २० हजार रुपये रोख दिले जायचे. हा आकडा आता ५० हजार आणि एक लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याने साहित्यिकही लखपती करून सोडणाऱ्या या पुरस्कारांची वाट पाहत असतात. त्यामुळेच या पुरस्कारांसाठी एक वेगळी अहमहमिका त्यांच्यात असते.
२०१० मध्ये हे पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या २७ फेब्रुवारी जन्मदिनी पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ठरल्याप्रमाणे पुरस्कार न देता ४ जुलैला पुरस्कार प्रदान करण्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. वैदर्भीय साहित्यिकांनी वेगवेगळ्या साहित्य प्रकारात २०११-१२ चे पुरस्कार पटकावले आहेत. मात्र, काहींनी व्यक्तिगत अडचणीपोटी तर काहींनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या असमाधानकारक उत्तरामुळे पुरस्कार सोहळ्याला जाणे टाळल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
विदर्भातील पुरस्कार प्राप्त या साहित्यिकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले, मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे २ जुलैला पत्र आले. पत्रात ४ जुलैला सायंकाळी पाच वाजता पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून एक तासापूर्वी उपस्थित राहण्यासंबंधी कळवले होते. मंडळाने कार्यक्रमासाठी पुरेसे आधी कळवायला हवे होते. एकदम २ जुलैला पत्र आल्यानंतर ४ जुलैला हजर राहणे शक्यच नव्हते.
त्याठिकाणी उतरण्याच्या, थांबण्याच्या कोणत्याच व्यवस्थेबद्दल आधी बोलणेही झाले नसल्याने मंडळाच्या अध्यक्षांना याविषयी विचारण केली. मात्र, त्यांचे बोलणे उद्वेगजनक असल्याचे या साहित्यिकाने सांगितले. यासंबंधी मराठी भाषा विभागाचे सर्वेसर्वा असलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून येत्या २० जुलैपर्यंत उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार सन्मानपूर्वक घरी पोहोचवला नाही तर २१ जुलैला मराठी भाषा विभाग आणि मंडळाच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून पुरस्कार शासनाला परत करण्याचा इशारा या साहित्यिकाने दिला आहे. पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये कवी डॉ. श्रीधर शनवारे आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांचाही समावेश आहे. डॉ. शनवारे प्रकृती अस्वस्थ्यामुळे जाऊ शकले नाहीत. त्यांना १५-२० दिवसांपूर्वी मंडळातर्फे त्यांच्या एकूण व्यवस्थेसंबंधीची विचारणा झाली होती. तेव्हाच मुंबईला येणे शक्य नसल्याचे शनवारे यांनी कळवले होते तर द्वादशीवार वैयक्तिक कारणामुळे पुरस्कार घेण्यास जाऊ शकले नाहीत.
विदर्भातील साहित्यिकाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार सोहळा हुकला
मराठी भाषा विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण पत्र पुरेशा आधी न मिळाल्याने नाराज झालेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकाने पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला जाण्यास नकार दिला. पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. या सोहळ्याचे निमंत्रण सदर साहित्यिकाला २ जुलैला पाठविण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-07-2013 at 02:58 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbhas literature missed state literature award ceremony