व्हिडिओकॉन कंपनीच्या संचालकांकडे तब्बल २० दशलक्ष डॉलर म्हणजे तब्बल १०८ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या युगांडातील तीन बडय़ा नेत्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. परराष्ट्र व्यवहार खात्याची परवानगी मिळाली नसल्याने त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
एप्रिल महिन्यात युगांडाचे नागरिक असलेल्या यागुला मथाई (३५), इझाक मुसाम्बा (५२) आणि मावंडा मारोडा (४५) या तिघांविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यापैकी एक युगांडाच्या पार्लमेंटचा सदस्य आहे तर एक माजी मंत्री आहे. तिसरा आरोपी युगांडातील मोठा व्यावसायिक आहे. व्हिडिओकॉन कंपनीच्या चार संचालकांना धमकावून या तिघांनी त्यांच्याकडे २० दशलक्ष डॉलची खंडणी मागितली होती. २००९ साली व्हिडिओकॉन कंपनीने युगांडामध्ये एका खाणीचा प्रकल्प उभारला होता.
युगांडातील एका व्यावसायिकाच्या मदतीने हा व्यवसाय सुरू झाला होता. परंतु कंपनीने तो प्रकल्प त्याच वर्षी बंद केला होता. या तिघांनी फोर्ट येथील कंपनीच्या कार्यालयात जाऊन कंपनीच्या संचालकांना धमकावले होते. तुम्ही फसवणूक केली असून तुमच्याविरोधात अटकेचे ‘इंटरपोल’चे आंतराराष्ट्रीय अटक वॉरंट निघाले आहे, असे त्यांनी सांगितले. ही अटक टाळण्यासाठी तसेच व्हिडिओकॉन कंपनीचे गोवले जाऊ नये, यासाठी या तिघांनी संचालकांकडे लाच मागितली होती.
याप्रकरणी कंपनीतर्फे मार्विन फर्नाडिस यांनी माता रमाबाई मार्ग, आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या तिघांविरोधात खंडणी, धमकावणे, कट रचणे आदी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती. आरोपी हे परदेशी नागरिक असल्याने त्यांच्या अटकेसाठी परराष्ट्र व्यवहार खात्याची परवानगी आवश्यक असते. त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला असून अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परदेशी नागरिक असल्याने पोलीस काळजीपूर्वक तपास करीत होते.
या तिघांना अटक झालेली नसली तरी त्यांचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे आरोपी देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा