‘शकुंतले’चे ब्रॉडगेज रूपांतरण अधांतरीच
वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग अद्याप कागदावरच
दोन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण, नरखेड मार्गावर पॅसेंजर, एका गाडीचा विस्तार आणि फेऱ्यांमध्ये वाढ वगळता रेल्वेने पश्चिम विदर्भाच्या पदरात यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतेही मोठे दान टाकलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रकल्प सर्वेक्षणाच्या टप्प्यावरच अडकून पडलेले असताना आता नव्या सर्वेक्षणातून काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात पश्चिम विदर्भासाठी महत्वपूर्ण अशा अचलपूर-मूर्तीजापूर-यवतमाळ रेल्वे मार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतरणासाठी कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने पुन्हा निराशाच वाटय़ाला आली आहे. या रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणासाठी ४६४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
यासंदर्भात कित्येक वर्षांपासून मागणी केली जात असूनही या शकुंतला रेल्वेचे भवितव्य उजळू शकलेले नाही. रेल्वे अर्थसंकल्पात मलकापूर-चिखली या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली आहे. २०११ मध्ये खामगाव-जालना मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा करण्यात आली होती.
जालना-खामगाव-मलकापूर-चिखली, असा २४० किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे प्रकल्प १ हजार २६ कोटी रुपयांचा आहे. याशिवाय, वाशीम-माहूर-आदिलाबाद या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा झाली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनाच्या कामाला मात्र गती मिळू शकलेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात या मार्गाचा उल्लेखही नाही.
अमरावती-नरखेड हा रेल्वे मार्ग तयार होऊनही इंदोर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या आठ फेऱ्या वगळता या मार्गावर प्रवासी गाडी धावलेली नाही. या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झालेले नसल्याने डिझेल इंजिनच्या सहाय्याने या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. विद्युतीकरणासाठी भरीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातून या मार्गाचा कायापालट होणार काय, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी या मार्गावर नवीन अमरावती ते नरखेड पॅसेंजर, तसेच भुसावळ-अमरावती पॅसेंजरचा नरखेडपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील प्रवाशांना थेट वरूड, नरखेडपर्यंत पोहोचण्याची सुविधा मिळणार आहे. या मार्गावर गेल्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या इंदोर-यशवंतपूर आणि अजमेर-सिकंदराबाद या दोन एक्स्प्रेस अजूनही सुरू झालेल्या नाहीत.
अमरावती-पुणे (लातूरमार्गे) देखील अडकून पडली आहे. अमरावती-जबलपूर ही आठवडय़ातून तीन दिवस धावणारी एक्स्प्रेस आता दररोज झाली आहे. नव्याने मंजूर झालेल्या अजनी (नागपूर) ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेस (हिंगोली मार्गे), पुरी-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस, गांधीधाम-विशाखापट्टनम एक्स्प्रेस आदी गाडय़ांचा फायदा पश्चिम विदर्भाला मिळू शकेल.
पश्चिम विदर्भातून मराठवाडय़ात जाण्यासाठी गाडय़ांच्या संख्येत वाढ होत असतानाही कोकणात जाण्यासाठी कोणतीही गाडी नसल्याने विदर्भातून थेट गाडी सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. भुसावळ-हजरत निझामुद्दिन गोंडवाना एक्स्प्रेस नरखेडमार्गे सुरू करावी, या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Story img Loader