खामगांव-जालना रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यावर औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडेल. औद्योगिक, व व्यापारी क्षेत्रात शेतीवर आधारित सोयाबीन, कोपूस या पिकावर प्रक्रिया करणारे कारखाने सुरू होऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. विदर्भ, मराठवाडा, शेगांव, शिर्डी आदी स्थळ जोडल्या जातील. त्यामुळे हजारो भाविकांना सुविधा उपलब्ध होईल. या रेल्वेमार्गाची मागणी १०० वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी १ हजार २६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामधील अर्धा खर्च राज्य शासनाने करावा, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.
अधिवेशनाआधी संपूर्ण महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत खासदार प्रतापराव जाधव यांनी ही मागणी केली. बैठकीत कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत अनेक मंत्री उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्य़ातील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यात बुलढाणा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा. जिल्ह्य़ात भीषण पाणीटंचाई आहे. त्याकरिता शुध्द पाण्याचे टॅंकर सुरू करा, चारा डेपो छावणी सुरू करा, यंदा पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्य़ात दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करा, संत्रा, मोसंबी, डाळींब, द्राक्ष आदी फळबागा दुष्काळामुळे वाळून गेल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बुलढाणा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. विदर्भात सुध्दा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. विदर्भातील ६ जिल्ह्य़ांमध्ये ९० टक्के  सबसिडीवर तुषार सिंचन, ठिबक सिंचन द्यावे. कमी पाऊस पडल्याने यात वाढ करण्यासाठी ठिबक पध्दतीमुळे वाढ होईल. कोणतीही अट न घालता सबसिडी द्यावी व जिल्ह्य़ात लहान, मोठे व मध्यम स्वरूपाचे प्रकल्प निधीअभावी रखडलेले आहेत त्यांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. दुष्काळी परिस्थितीत कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या व खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा