ज्यांनी अतोनात कष्टाने व प्रचंड विरोधाचा सामना करून सौजन्य व माणूसकी जोपासत महाराष्ट्राची जडणघडण केली त्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी वर्ष असूनही या महान नेत्याला विदर्भ विसरला आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत आता उरलेल्या सहा-सात महिन्यांचा काळ वैदर्भीय जनतेने वसंतरावांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करावे, हीच वसंतरावांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी येथे व्याख्यानाच्या वेळी व्यक्त केले.
‘यशवंतराव, वसंतराव आणि जवाहरलाल’ या विषयावर दर्डा मातोश्री सभागृहात भावे यांचे एक व्याख्यान झाले, तर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ‘यशवंतराव आणि वसंतराव’ या विषयावर दुसरे व्याख्यान झाले. या दोन्ही कार्यक्रमात वसंतराव नाईकांना विदर्भच विसरला आहे, अशी खंत व्यक्त करून भावे म्हणाले की, हे वर्ष यशवंतराव चव्हाण यांचे सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन करून यशवंतरावांचे ऋण फेडण्यासाठी सारा पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढला, मात्र विदर्भात वसंतराव नाईकांच्या जन्मशताब्दी वर्षांत विदर्भाची जनताच वसंतरावांना विसरली आहे. अजूनही वेळ गेली नाही. सहा सात महिन्यांचा अवधी आहे. या काळात साऱ्या विदर्भात वसंतराव नाईकांच्या विचारांच्या कार्याची माहिती जनतेला द्या, विविध उपक्रम राबवा आणि अंशत: तरी ऋण फेडा, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
यशवंतराव, वसंतराव आणि जवाहरलाल यांनी राज्याला दिलेली देणगी म्हणजे सकारात्मक विचार करून जनसेवा करा, बडेजाव मिरवू नका, प्रसिद्धीच्या मागे लागू नका, राजकारण, समाजकारण आणि एकूणच जीवनात आदर्शवत वर्तणूक ठेवा, असा उपदेशही त्यांनी केला. देशात आज गांधी आहेत, पण ‘महात्मा’ आहे काय? नायडू आहेत, पण ‘सरोजिनी’ आहे काय? पटेल आहेत, पण ‘सरदार’ आहेत काय? आझाद आहेत, पण ‘मौलाना’ आहेत काय? चव्हाण आहेत, पण यशवंतराव आहेत काय, असा सवाल करून मधुकर भावे यांनी राजकीय नेत्यांची चांगलीच फिरकी घेतली.
‘जय महाराष्ट्र’ म्हणणे सोपे आहे, पण महाराष्ट्र घडवणे फार कठीण आहे. वृत्तपत्रात ९० टक्के जागा १० टक्के वाईट लोकांसाठी व १० टक्के जागा ९० टक्के प्रामाणिक असलेल्यांसाठी असते. ही आजची पत्रकारिता आहे, असे सांगून भावे म्हणाले, हे असेच चालत राहिले तर लोकशाहीचे काही खरे नाही. यशवंतराव-वसंतराव हे महाराष्ट्राचे धन होते. ते आम्ही गमावले आहे. यशवंतरावांनाच आम्ही सोडले म्हणून आजची दूरवस्था आहे, असे ते म्हणाले.
दर्डा मातोश्री सभागृहात खासदार विजय दर्डा, आमदार नीलेश पारवेकर, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि उषा दर्डा व्यासपीठावर होत्या. प्राचार्य शंकर सांगळे यांनी आभार मानले. जिल्हा परिषद सभागृहातील कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, आमदार नीलेश देशमुख, विलास मराठे, माजी आमदार लक्ष्मण तायडे, माजी आमदार बबन चौधरी, जिल्हा परिषदेचे सीईओ नवलकिशोर राम, उपाध्यक्ष ययाती मनोहर नाईक, सभापती सुभाष ठोकळ व्यासपीठावर होते. कार्यक्रमाचे संचालन कैलाश राऊत यांनी, तर आभार मोतीकर यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा