मध्य भारतात नागपूर हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तरीही नागपुरातून दिल्लीसाठी ‘नॉन स्टॉप’ गाडी नागपुरातून जात नाही. नव्या अर्थसंकल्पात नॉन स्टॉप गाडीची घोषणा व्हावी, अशी अपेक्षा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे.
रेल्वे अर्थसंकल्प हा २६ फेब्रुवारीला सादर होणार असून या पाश्र्वभूमीवर नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव हेमंत गांधी यांनी रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांना पत्र पाठविले आहे. देशाच्या अन्य शहरातील व्यापारी नागपूर ही मोठी व्यापारपेठ असल्याने येथे नियमित येत असतात त्याचप्रमाणे येथील व्यापारी इतर शहरात जात असतात. म्हणून जैसलमेर व्हाया अजमेर, गुवाहाटी, बंगलोर, हरिद्वार, रायबरेली व जयपूर या शहरांसाठी नव्या गाडय़ा सुरू कराव्या. तसेच नागपूर- पुणे ही गरीबरथ गाडी दररोज सुरू करावी. कच्छपर्यंत नागपूर-अहमहदाबाद प्रेरणा एक्सप्रेस सुरू करावी, नागपूर- जबलपूर एक्सप्रेस अलाहाबाद, फैजाबाद, अयोध्या शाहगंज, भहुबलिया मार्गे धनबादपर्यंत वाढवावी, नागपूर -दिल्ली व दिल्ली-नागपूर ही नॉनस्टॉप गाडी सुरू करावी, अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस ही नरखेडपर्यंत, अमरावती -जबलपूर अलाहाबादपर्यंत  व नागपूर शिवणगाव बिलासपूरच्या पुढे हावडापर्यंत वाढवावी. हावडा -मुंबई गीतांजली एक्सप्रेसला शिर्डी येथे थांबा द्यावा, अशा अपेक्षा नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केल्या आहेत. तसेच प्रवासात खाद्यपदार्थ उत्तम दर्जाचे मिळावे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
 विदर्भ विकासाच्या दृष्टीने नागपूर शहराचा रेल्वेचा नॅशनल हब म्हणून विकास होऊ शकतो त्यादृष्टीने विचार करावा. नागपूर शहरात मोतीबाग वर्कशॉफ आहे पण कोच व व्ॉगन फॅक्टरी सुरू करावी. नागपूर रेल्वेस्थानकावर वाहन पार्किंगची व्यवस्था ही एक समस्या आहे. हजारो प्रवासी येथून रोज ये-जा करत असतात त्यामुळे वाहन पार्किंगची  व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी जुने बस्थानक किंवा मॉडर्न स्कूलची जागा अधिग्रहित करून पार्किंगसाठी व्यवस्था करावी. प्लॅटफॉर्म स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नसून विशेषत: ४,५, ६ या प्लॅटफॉर्मच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही. त्याचप्रमाणे स्थानकाबाहेर पडल्यानंतर हॉटल्समुळे सर्वत्र घाण पसरलेली असून तो परिसर स्वच्छ ठेवावा.ोोधनी येथे दिल्लीवरून येणाऱ्या गाडय़ांना थांबा दिल्यास मुख्यस्थानकावर गर्दी होणार नाही. रेल्वे बोर्डाने नागपूरला स्वतंत्र झोनचा दर्जा द्यावा, अशी आशा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केली आहे.

Story img Loader