शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर १३ व १४ जानेवारी रोजी ११ वे विद्रोही साहित्य संमेलन होणार असून, या साहित्य संमेलनात परिसंवाद, खुली चर्चा, शाहिरी जलसा यांसह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जगदेव यांनी दिली.
संमेलन स्थळास प्रतिसरकार नागनाथ नायकवाडी साहित्य नगरी असे नाव देण्यात येणार आहे, तर सभागृह मनोहर पाटील यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. दलित साहित्यिक ऊर्मिला पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि अहमदाबाद येथील बुधान थिएटरचे दक्षिण बजरंगी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज चव्हाण, शंकरराव लिंगे, नाना ठाकरे, पुष्पराज शेट्टी, रामसिंग गावित उपस्थित राहणार आहेत.
१३ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता विद्यावर्धिनी महाविद्यालयापासून निघणाऱ्या परिवर्तन फेरीचे उद्घाटन माजी आमदार जे. यू. ठाकरे यांच्या हस्ते होईल. संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुपारी तीन वाजता ‘समकालीन संस्कृतीमधील संघर्ष आणि विद्रोहाची दिशा’ तसेच ‘जिणं बाईचं: हिंदू कोडबील ते ऑनर किलिंग-भारतीय संस्कृतीचा उफराटा प्रवास’ या विषयावर परिसंवाद होईल. डॉ. शर्मिली रेगे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी ‘शेतकरी आत्महत्या (पी. साईनाथ), स्वच्छ ऊर्जा-गलिच्छ कारवाया (अजित देशमुख दिग्दर्शित लघुपट), सिद्धार्थ कॉलनी रहिवासी हक्क, हे लघुपट दाखविण्यात येतील. रात्री अरुणचंद्र गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल.
दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यशोधक कलापथकाचे नृत्य, डोंगऱ्यादेव उत्सव सादर होईल. यानंतर वामनदादा कर्डक स्मृति शायरी जलसा होईल. सरोज कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई-दिल्ली कॉरिडॉर: विकास की विनाश’ या विषयावर चर्चा होईल. २८ नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन, दलित अत्याचार, शिक्षणातील मनुवाद आणि मनीवाद, आदिवासी वन हक्काचा कायदा, नवीन भूसंपादन कायदा, मनुस्मृती दहन दिन, प्रेम-नकार, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, अहिराणी भाषा, मराठीचे मारेकरी, जागतिकीकरण विरोधी क्रांतिकारी जनआंदोलन आदी विषयांवर खुली चर्चा होणार आहे. दीनानाथ मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता ‘शेतकऱ्यांचे दु:ख आत्महत्येपर्यंत गेले, तरीही ग्रामीण साहित्य विद्रोहीपर्यंत का पोहचले नाही’ तसेच ‘आदिवासी संस्कृती इतिहास आणि वर्तमान’ विषयावर परिसंवाद होईल. समारोप तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा