छात्र जागृती संस्थेच्या वतीने अ‍ॅड. निशांत गांधी यांनी आयोजित केलेला विविध क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या आणि कलावंत, कवी, गायकाची सुप्त प्रतिभा दडलेल्या मान्यवरांचा ‘छुपे रुस्तम’ ने रसिकांची मने जिंकून घेतली. शंकरनगर चौकातील साई सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे आमदार सुधाकर देशमुख आणि अ‍ॅड. निशांत गांधी यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले.
अनेक माणसांना वेगवेगळे छंद असतात, परंतु छंद किंवा कलांमध्ये अनेकांचे भविष्य घडत नसले तरी त्यांच्या मनात ती कला सतत फुलत असते. विविध क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या मात्र कवी, कलावंत व गायक असलेल्या ‘छुपे रुस्तम’ने यावेळी आपापल्या कलांचे सादरीकरण करून उपस्थितांना आनंद दिला. या कार्यक्रमात महापौर अनिल सोले, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, विवेक देशपांडे तसेच बाळ कुळकर्णी यांच्यासह प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, न्युरोसर्जन डॉ. लोकेंद्र सिंह, रेडिओलॉजिस्ट डॉ. रमेश गांधी या सर्वानी गायन, व्यंग, गझल, कविता व मिमिक्री सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
विवेक देशपांडे यांनी शारदास्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यांनी ‘आज की रात मेरे, दिल की आवाज भी सून’, ‘जीवन से भरी तेरी आँखे..’ ही गीते सादर केली. शैलेश पांडे यांनी त्यांच्या भावस्पर्शी कविता व गझलांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. विष्णू मनोहर यांनी अभिनेता नाना पाटेकर यांची हुबेहूब नक्कल करून रसिकांची दाद घेतली. सोबतच सुरेश भटांच्या कवितेवरचे विडंबन सादर करून उपस्थितांना हसवले.
लोकेंद्रसिंग यांनी विनोदी कविता तर महापौर अनिल सोले यांनीही राष्ट्रभक्तीपर कविता सादर केल्या. बाळ कुलकर्णी यांनी कृष्णबिहारी नूर ते गालिबपर्यंतच्या रचना सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. अशा या विविध क्षेतातील मान्यवरांनी त्यांच्या कलांच्या माध्यमातून रसिकांवर ठसा उमटवला. कार्यक्रमाचे निवेदक डॉ. रमेश गांधी यांनी वऱ्हाडी कविता सादर करून सभागृहात हास्यरस निर्माण केला. उद्घाटनाच्या सोहळ्याचे संचालन अमित वाजपेयी यांनी केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार ल.त्र्यं. जोशी, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील, आमदार सुधाकर देशमुख, अनंत दीक्षित, अ‍ॅड. निशांत गांधी यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Story img Loader