आपली पत्नी शेजारी बसलेली असताना सर्वासमोर तिच्यावर विनोद करणे म्हणजे किती धारिष्टय़ाचे आणि शौर्याचे काम..पण येवल्याचे प्रभाकर झळके सर न घाबरता न डगमगता सौभाग्यवतींसमोर चक्क त्यांच्यावर केलेला विनोद सांगतात, स्वत: खळखळून हसतात..समोरच्यांनाही हसवतात. मात्र हे करीत असताना मोठा पराक्रम गाजवल्याचा आव काही आणत नाहीत. एखादे घर विनोदाशी, मिस्कीलतेशी इतकं घट्ट जोडले गेले असेल यावर विश्वासच बसत नाही. झळके सर सांगतात, ‘अहो, मी गाढ झोपेत असताना आमची बायको झोपेच्या गोळ्या घेऊन येते आणि मला झोपेतून उठवून म्हणते, ‘उठा, तुमची झोपेच्या गोळ्या घ्यायची वेळ झाली’ या विनोदाचा खुसखुशीतपणा ताजा असतानाच तत्काळ ते आपल्या बायकोच्या हुषारीची झलक दाखविणारा किस्सा एखाद्या झणझणीत पदार्थासारखा समोर ठेवतात. ‘मी बायकोला म्हणतो. सारखे माझ्याकडे पन्नास रुपये, शंभर रुपये मागत असतेस, त्यापेक्षी कधी थोडी अक्कल तरी माग, तर माझी बायको मला लगेच विनम्रपणे म्हणते ज्याच्याकडे जे असेल तेच मागितले पाहिजे ना’ आणि मग झळकेंचे ते कलासक्त, मनोहारी घर लगेच हास्यकल्लोळात बुडून जाते.
अवघ्या महाराष्ट्राला आपल्या व्यंगचित्रांनी हसविणारा हा हाडाचा कला शिक्षक, प्रसिद्ध व्यंगचित्रकार आपल्या घरातही कसा मिस्कीलपणा जपून आहे, मुळातल्या धीरगंभीर चेहऱ्यावर टवटवीत हास्य कसा टिकवून आहे याचा ‘याचि देही याची डोळा’ प्रत्यय त्यांच्या गोजीरवाण्या घरात येतो.
झळके सर हा माणुसच भारी कलंदर, भन्नाट. त्यांच्या सहवासात, येवलेकरांच्या सानिध्यात गेल्यावर या माणसाचे एक ना अनेक पैलू समोर येतात. येवल्यात गेल्यावर जाणवते झळके सर म्हणजे येवल्याबद्दलच्या प्रचंड अभिमानात, कौतुकात आकंठ बुडालेले अद्भूत रसायनच आहे. आपल्या शहराबद्दल आलेल्या पाहुण्यांना किती सांगावे आणि किती नाही असे त्यांना होऊन जाते. त्यामुळे त्यांना वेळेचेही भान राहात नाही. गावातल्या परंपरागत उत्सवांबद्दल सांगताना त्यांच्यात एवढा विलक्षण उत्साह संचारला तरी कुठून, याचे उत्तर ऐकणाऱ्यांकडेही नसते. कधी मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन त्यावर रंगरंगोटी कर..आपले वय विसरून नवरात्रात कोटमगावच्या देवी मंदिर परिसरात धडपड मंचच्या माध्यमातून भक्तांच्या चपला सांभाळण्यासाठी ‘चरणसेवा’ उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घे..कदाचित स्वत: मांजाची आसरी घेऊन पतंग उडविणार नाहीत पण आमच्या येवल्याचा संक्रातीचा पतंगोत्सव बघा एकदा, असे म्हणत बाहेरगावच्या पत्रकारांना घेऊन पार अगदी मोठमोठय़ा इमारतींच्या गच्चीवर, दुकानांच्या छतावर नेऊन पतंगोत्सवाची मजा अनुभवायला लावतील.
या सृजनशील कलावंतात समाजाशी घट्ट नाळ जुळलेला माणूस दडला आहे. धडपड मंचच्या अनेक सातत्यपूर्ण उपक्रमांनी त्याची साक्ष पटवून दिली आहे. संसाराबरोबरच समाजकारणाचाही रथ निष्ठेने ओढणारे झळखे सर येवल्याच्या पैठणीप्रमाणेच महाराष्ट्रात सर्वदूर जाऊन पोहोचले आहेत. हा कलावंत सध्या वस्तू संग्रहालयाच्या अभिनव कल्पनेत एकदम व्यस्त आहे. कला जीवंत राहिली पाहिजे या ध्यासातून झळके सर जुन्या, कलात्मक वस्तू गोळा करण्यात गुंतले आहेत. जुन्या घरांमधील लाकडांवरची कोरीव कामे नव्या उभारणीत नष्ट होत आहेत. अडगळीत, रद्दीत चाललेल्या कलात्मक गोष्टी कलेचाच ऱ्हास करीत आहेत. यामुळे व्यथित झालेले सर अशा वस्तू रस्त्यावर, भंगार म्हणून विकल्या जाऊ नयेत उलट त्या स्वत:कडे कशा येतील यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या करिता अशा दुर्मिळ वस्तु स्वत: विकत घेणे, किंवा सरळ वस्तू मालकाकडे जाऊन चक्क वस्तू मला देऊन टाक असा हट्ट धरणे, असे अनेक प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या कलेवरील प्रेमापोटी त्यांचे स्नेही अशा वस्तू त्यांना भेट म्हणूनही देत आहेत आणि त्यातूनच झळके सर त्यांच्या स्वत: च्या घरात छोटेखानी वस्तू संग्रहालयच उभारताना दिसतात.
जुन्या लाकडावरील कोरीव कामे, सुंदर नक्षीकाम असलेले दगड, जुन्या पितळी, लोखंडी, लाकडी वस्तु काचेच्या हंडय़ा, जुने कलात्मक अडकित्ते, कल्पक कुलूपे असे सारे काही त्यांच्या वस्तु संग्रहालयात जमा आहे. जुन्या कलात्मक वस्तु रस्त्यावर आणू नका असे त्यांचे सर्वाना कळकळीने सांगणे आहे. जुन्याचे नवे करताना अशा काही कोरीव काम असलेल्या वस्तू कोणी अडगळ म्हणून टाकून देणार असेल, अल्प भावात मोडीत काढणार असले तर त्यांनी त्या झळके सरांच्या वस्तु संग्रहालयाला द्याव्यात. त्यातून कला जीवंत राहीले.
सत्तरी ओलांडलेल्या वयाची फिकीर न करता सतत धावपळ करून झळके नावाची जणू सामाजिक, सांस्कृतिक संस्था सध्या सहकारी कार्यकर्त्यांचा पाठिंबा व सहकार्यावर अखंड कार्यरत आहे. येवला परिसरातील त्यांच्या धडपडीला वेगळेच ‘मोल’ आहे. राजकारणापासून चार हात लांब असणारे झळके सर आवर्जून डोक्यावर पांढरी टोपी घालतात. विचारले ंतर म्हणतात, ‘कोणी आपल्याला टोपी घालू नये म्हणून ही टोपी’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते व्यंगचित्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले नाही व वेश्यांच्या मुलांसाठी संस्कार संगोपन केंद्र उघडता आले नाही याची झळके सरांना खंत वाटते. मात्र राज ठाकरेंच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नाही. बोलक्या बाहुल्या हातात घेऊन धमाल करणारा, क्षणात जादूचे प्रयोग करून चिमुरडय़ांना आनंद बहाल करणारा, नर्म विनोदाने ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात जगण्याचे बळ पेरणारा, खिशात चॉकलेट घेऊन हिंडणारा आणि भेटणाऱ्या छोटय़ा मुलांच्या हातात ते ठेवणारा हा माणूस म्हणजे एक वेगळीच जादू आहे. एकूण काय तर येवल्याच्या बालाजी गल्लीतील झळके सरांच्या वस्तु संग्रहालयाबरोबरच त्या घरातील या अजब, अवलिया, माणसाचा स्वभाव अगदी अनुभवण्यासारखा
बहुआयामी
आपली पत्नी शेजारी बसलेली असताना सर्वासमोर तिच्यावर विनोद करणे म्हणजे किती धारिष्टय़ाचे आणि शौर्याचे काम..पण येवल्याचे प्रभाकर झळके सर न घाबरता न डगमगता सौभाग्यवतींसमोर चक्क त्यांच्यावर केलेला विनोद सांगतात, स्वत:
First published on: 09-07-2013 at 08:22 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: View on prabhakar zalke work