दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामापोटी भुजबळ कुटुंबिय संचालक असलेल्या तीन कंपन्यांच्या खात्यात १७ कोटी ९१ लाख रुपये जमा झाले की नाहीत, सदनाचे काम निविदा न काढता चमनकर यांना का दिले गेले, इंडिया बुल्स कंपनीला मुंबई शहरातील विद्यापीठासाठी राखून ठेवलेली जमीन दिली गेली की नाही.. असे वेगवेगळे १९ प्रश्न आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे यांनी उपस्थित करत छगन भुजबळ यांनी त्यांची उत्तरे द्यावी अशी मागणी केली आहे.
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत पांढरे यांनी हे प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी आपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दहा प्रश्न विचारत उत्तरे देण्याची मागणी केली होती. दीडशे कोटीच्या महाराष्ट्र सदनाच्या बांधकामापोटी बेकायदेशीरपणे एक हजार कोटींचे चटईक्षेत्र का बहाल करण्यात आले, इंडिया बुल्स कंपनीने छगन भुजबळ फाऊंडेशनला अडीच कोटी रुपयांची देणगी दिली की नाही, परवेझ कस्ट्रक्शन प्रा. लि. या  कंपनीचे केवळ १०० रुपये किंमतीचे भाग होते ते अनेक बोगस कंपन्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये प्रती समभाग याप्रमाणे खरेदी केल्यामुळे भुजबळांच्या कंपन्यांना शेकडो कोटी रुपये मिळाले की नाही, असे अनेक प्रश्न पांढरे यांनी उपस्थित केले. टूजी घोटाळ्यातील डी. बी. रिएल्टर्स कंपनीकडून परवेझ कंस्ट्रक्शन कंपनीला २१ कोटी रुपये सारस्वत बँकेच्या खात्यात मिळाले की नाही, एका चिखलीकरकडे इतकी मोठी बेनामी संपत्ती सापडते, मग आपल्याकडे किती संपत्ती असेल, मुंबई एज्युकेशन ट्रस्टला नाशिकमधील करोडो रुपयांची चार एकर जमीन नऊ लाखात देण्यात आली हे खरे आहे काय, असे प्रश्न पांढरे यांनी केले. सार्वजनिक बांधकाम खात्यातील बदल्यांमध्ये लाखो, करोडो रुपयांचे व्यवहार झाले आहेत हे खरे नाही का, नार्को टेस्टमध्ये तेलगीने आपले नाव का घेतले, असे प्रश्न उपस्थित करून पांढरे यांनी भुजबळांनी त्यांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे.

Story img Loader