राजकारणी, शासकीय अधिकारी आणि प्रशासन यांच्या संगनमताने देशात आज सर्वच स्तरात भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचाऱ्यांनी आपला देश विकून खाल्ला, असा आरोप करत ही व्यवस्था बदलण्यासाठी आपण राजकारणात उतरलो असल्याचे नाशिक लोकसभा मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पांढरे यांनी सांगितले. येथील नामदार गोपाळकृष्ण गोखले वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन विभागाच्यावतीने आयोजीत ‘राजकीय जनजागृती’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पक्ष प्रवक्ता प्रभाकर वायचळे यांच्यासह विभागप्रमुख प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा उपस्थित होते. यावेळी पांढरे यांनी आपच्या उमेदवारांचा राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नसल्याचे सांगितले. सध्याची भ्रष्ट व्यवस्था बदलण्यासाठी ‘आप’चा जन्म झाला. व्यवस्थेत उतरून व्यवस्था बदलावी लागेल या केजरीवाल यांच्या विचाराला अनुसरून आम्ही सारे निवडणुकीला सामोरे जात असल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत काँँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा दणदणीत पराभव होणार असल्याचे भाकित त्यांनी केले. राष्ट्रवादी आपल्या हक्काच्या मतदार संघाव्यतिरिक्त फारसे कुठे चमकणार नाही असे सांगत विविध राजकीय पक्षांवर ताशेरे ओढण्याची संधी त्यांनी सोडली नाही.
मोदी पंतप्रधान झाल्यास अंबानीं सारख्या उद्योजक व कंत्राटदारांचे भले होईल. सर्वसामान्यांचा त्यांच्या राजकारणाचा काहीही लाभ होणार नाही असा दावा त्यांनी केला. उलट गरीब व श्रीमंत यातील दरी वाढून नक्षलवाद वाढीस लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भुजबळ यांच्यावर त्यांनी टिकास्त्र सोडले. शिक्षण संस्था उभारून सर्वसामान्यांची लूट ते करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे विद्यार्थ्यांंकडून नैतीकतेची अपेक्षाच करता येत नाही. आप सत्तेत आल्यास राज्यात शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर बंधारे बांधून मुबलक पाणीसाठा उपलब्ध करून दिला जाईल, तसेच भ्रष्टाचार मुक्त शासन, प्रशासनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे ते म्हणाले. ‘आप’ पक्षाला अपेक्षित ‘नाशिकचा विकास’ या मुद्दय़ाला मात्र त्यांनी सोईस्करपणे बगल दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशिगंधा मोगल यांनी केले. प्रा. मेधा साईखेडकर यांनी आभार मानले.

Story img Loader