विकास सहकारी साखर कारखाना बायोगॅसवर आधारित सीएनजी व सौरऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमित देशमुख यांनी केली. विकास कारखान्याचे नामकरण ‘विलास कारखाना’ असे होईल, असे सूतोवाचही त्यांनी केले. कारखान्याच्या विशेष सभेत तसा ठरावही संमत करण्यात आला.
सहकार कायद्यात केंद्र व राज्य सरकारांनी सुचविलेल्या दुरुस्त्या, पोटनियमांमधील बदलास मंजुरी देण्यासाठी रविवारी कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार वैजनाथ शिंदे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष विजय देशमुख, कार्यकारी संचालक एस. डी. बोखारे आदी उपस्थित होते.
कारखान्याने टंचाई स्थितीत ५ लाख टन उसाचे गाळप केले. भविष्यात विकासचे गाळप ५ हजार मेट्रिक टन प्रतिदिन होणार आहे. ७ हजार लिटर डिस्टिलरीचे उत्पादन होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर उसावर बंदी घालण्याची मागणी केली जात असल्यामुळे ऊसउत्पादकांनी ठिबक व तुषारचा वापर करावा. आगामी पाच वर्षांत शंभर टक्के ठिबकवर विकास चालेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कारखाना निधीसाठी ५० लाख रुपये कारखाना देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. विकास कारखान्याचे नामकरण ‘विलास कारखाना’ असे होईल. कारखाना परिसरात विलासराव देशमुखांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाईल. या स्मारकातून लोकांचे प्रबोधन व्हावे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदी समाजोपयोगी प्रकल्प उभे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी या वर्षीच्या हंगामात २१ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले. ५०० कोटी रुपये शेतक ऱ्यांना उसापोटी दिले असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आभार विजय देशमुख यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा