दिल्लीत राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून न्यायालयीन लढय़ातही भक्कम साथ देऊन खंडकरी शेतकऱ्यांना सातत्याने मदत करण्याची भूमिका ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी नेहमीच घेतली. यापुढेही त्यांनी आमच्या पाठिशी खंबीर उभे रहावे, असे साकडे खंडकरी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना घातले.
खंडकरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जमिनी वाटपाचा प्रारंभ झाल्यानंतर खंडकरी शेतकरी चळवळीचे नेते माजी आमदार बी. डी. पाटील (वालचंदनगर), अण्णासाहेब थोरात (श्रीरामपूर) यांच्या नेतृत्वाखाखाली एका शिष्टमंडळाने काल विखे यांची लोणी येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. अनिल शिराळकर, अरुण सावंत, दगडू पाटील (सर्व वालचंदनगर), ित्रबकराव कुऱ्हे, कारभारी थोरात (श्रीरामपूर), अॅड. व्ही. जे. काजळे, बाळासाहेब नळे (कोपरगाव) यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
खंडकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनीचे नकाशे प्रसिध्द करु नये, शहरालगत असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनी संस्थांना देऊ नये, जमीन पट्टयांची अदलाबदल करावी, शेतकऱ्यांच्या पसंतीच्या जमिनी त्यांना विश्वासात घेऊन वाटप कराव्या, मिळालेल्या जमिनीवर सरकारने बँक कर्ज देण्यासाठी तरतूद करावी, अशा विविध मागण्या या शिष्टमंडळाने यावेळी केल्या.
खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीन वाटपात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल विभागाचे मुख्य सचिव यांच्या समवेत खंडकरी शेतकरी चळवळीतील नेत्यांची बैठक घेण्याबाबत आपण प्रयत्न करू, असे आश्वासन विखे यांनी या शिष्टमंडळाला दिले. खंडकऱ्यांसाठी आपण आपली सर्व पत खर्च केली, भविष्यातही आपण खंडकरी शेतकऱ्यांबरोबर राहणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.
विखे यांचा खंडकऱ्यांकडून सत्कार
दिल्लीत राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून न्यायालयीन लढय़ातही भक्कम साथ देऊन खंडकरी शेतकऱ्यांना सातत्याने मदत करण्याची भूमिका ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी नेहमीच घेतली. यापुढेही त्यांनी आमच्या पाठिशी खंबीर उभे रहावे, असे साकडे खंडकरी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना घातले.
First published on: 20-11-2012 at 03:01 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikhe honer by khadkari