काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे व शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संयुक्त दुष्काळी दौऱ्याला नेवासा तालुक्यातील स्थानिक शिवसैनिकांचा विरोध केला आहे. शहरप्रमुख नितीन जगताप यांच्यासह तालुका महिला आघाडीप्रमुख पुजाताई लष्करे यांनी निवेदन प्रसिध्दीस देऊन या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. ठरल्यानुसार उद्या (शनिवार) हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.  खासदार वाकचौरे व बाळासाहेब विखे यांचा संयुक्त दुष्काळी दौरा होत आहे. हा एकत्रित दुष्काळी दौरा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक निष्ठावान शिवसैनिकांनी आपण या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस हे केंद्र व राज्यात दोन्ही ठिकाणी सत्तेत असताना जनतेला फसवून शिवसेना व भाजपला हाताशी धरून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप पूजाताई लष्करे यांनी केला आहे. तालुक्यात स्थानिक काँग्रेस विविध आंदोलने करताना सेना व भाजपला बरोबर घेते, मात्र तालुक्याचे प्रश्न सरकार दरबारी मांडू शकत नाही. खासदार वाकचौरे यांच्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांनी जिवाचे रान केले. दुष्काळी दौऱ्याला आमचा विरोध नसून त्याअंतर्गत होत असलेल्या राजकारणाला आमचा विरोध आहे असे लष्करे यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर पंचायत समिती सदस्य जयाताई लष्करे, पप्पू परदेशी, गोरख घुले यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.