आदिवासी विभागातील कुपोषण आणि निरक्षरता घटविण्यासाठी मुंबईतील नवदृष्टी संस्थेने राबविलेला उपक्रम लाभदायक ठरला असल्याचे दिसून आले आहे. सध्या विक्रमगड तालुक्यातील माळेपाडा आणि कावळे गावात संस्थेच्या वतीने कुपोषित मुलामुलींसाठी खास वर्ग घेतले जात असून त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. दुर्गम-आदिवासी भागातील निरक्षरता आणि कुपोषणाचे मूळ कारण दारिद्रय़ असून ते दुष्टचक्र भेदण्यासाठी मुंबईतील नवदृष्टी संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या वैशिष्टय़पूर्ण उपक्रमात कुपोषित मुलांना दोन वेळा पोषक आहार देऊन नावीन्यपूर्ण साधनांद्वारे शिक्षणाची गोडी लावली जाते. संस्थेचा हा उपक्रम शासनाच्या अंगणवाडी योजनेस पूरक आहे. गावात अंगणवाडी सकाळी भरते. त्यामुळे दुपारी तीन वाजता मुले नवदृष्टीच्या वर्गात येतात. इथे त्यांना चित्रमय तक्त्यांद्वारे अंक तसेच अक्षरओळख, गाणी, गोष्टी शिकविल्या जातात. तसेच रोज वेगवेगळा खाऊ दिला जातो. गाजर आणि कोथिंबीर घातलेली गरमागरम इडली, निरनिराळे लाडू दररोज आलटून-पालटून मुलांना दिले जातात. कुरमुरे, शेंगदाणा, डाळ्यांचे लाडू तसेच सोयानटची पावडर त्यांना दिली जाते. खाण्यापूर्वी आवर्जून मुलांचे हात धुतले जातात. अभ्यास आणि खाणे झाले की मुले इथे खेळतात. त्यासाठी त्यांच्या बुद्धीला चालना देणारी अनेक खेळणी या वर्गात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पाच वाजता वर्ग सुटताना प्रत्येक मुलास एक कुपन दिले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता त्या कुपनवर प्रशिक्षणवर्गात त्यांना नाश्ता दिला जातो.
स्थानिकांचे उत्स्फूर्त सहकार्य
माळेपाडय़ातील श्री गणेश मित्र मंडळ या बचत गटाच्या माध्यमातून किरकोळ विक्रीचे एक दुकान गावात चालविले जाते. हिरेन पोवळे हा तरुण संस्थेच्या जागेतील हे दुकान सांभाळतो. संस्था त्यासाठी त्याच्याकडून कोणतेही भाडे घेत नाही, पण त्याबदल्यात मुलांना सकाळचा नाश्ता देण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता त्याने घंटा वाजवली, की मुले वर्गात येतात. चंद्रकला गावीत ही नववी शिकलेली स्थानिक तरुणी मुलांच्या अभ्यासाची तसेच आहाराची जबाबदारी सांभाळीत आहे. सोळाव्या वर्षी लग्न झालेल्या चंद्रकलेचा सासरी मूल होत नसल्याने छळ होत होता. अखेर त्या हालअपेष्टांना कंटाळून ती माहेरी माळेपाडय़ात परत आली. आता गावातील २० मुलांच्या भरणपोषण करण्याच्या कामात ती रमली आहे. कावळे गावातही स्थानिक प्रीती आणि शिवराम मुकणे हे दाम्पत्य तसेच सरिता हडबाळ हे तिघे या वर्गाचे व्यवस्थापन पाहतात. त्यांच्या घरातच मुले येतात. कावळे गावात जुलै महिन्यापासून तर माळेपाडय़ात नोव्हेंबर महिन्यापासून हा उपक्रम राबविला जात आहे.
अंगणवाडीला सुट्टी असल्याने रविवारी सकाळी दहा वाजता नवदृष्टीचे वर्ग भरतात. सध्या दोन्ही गावांतील वर्गात मिळून साधारण ३० ते ४० कुपोषित मुले या योजनेचा लाभ घेत आहेत. या मुलांच्या प्रगतीची नोंद ठेवली जाते. तसेच बुद्धय़ांकही मोजला जातो. माळेपाडय़ातील उपक्रम एक महिन्यापूर्वीच सुरू झाला, पण कावळे गावातील मुलांची प्रगती पाहता हा प्रयोग यशस्वी ठरला, असे मत नवदृष्टीचे डॉ. नागेश टेकाळे यांनी व्यक्त केले आहे. सध्या कावळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त ३० मुले आहेत. नवदृष्टीच्या उपक्रमामुळे मुलांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास मुख्याध्यापक चंद्रकांत भुसारा यांनी व्यक्त केला आहे.