लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने पराभूत झाल्यानंतर जवळजवळ मौनातच गेलेल्या विलास मुत्तेमवार यांनी अखेर संधी मिळताच सोमवारी काँग्रेस मेळाव्यात मनातल्या खदखदीलावाट मोकळी करून दिली. या पराभवास कारणीभूत ठरलेल्या आप्तस्वकियांना अप्रत्यक्षरित्या चिमटेही काढले. एका आमदाराचे तर त्यांनी ‘तिलकधारी’ असे नामकरणही करून टाकले.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी विदर्भ विभागीय काँग्रेस मेळावा सोमवारी नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंसह झाडून सर्व नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी बोलण्याची एकही संधी न सोडणाऱ्या मुत्तेमवारांनी दारुण पराभवाचा धसका घेतला. अपवाद सोडला तर त्यांनी बोलणेच सोडले होते. मेळाव्यात मात्र संधी मिळताच मनातली ही आग त्यांनी ओकून टाकली. मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत भाषणाचा योगही त्यांनी जमवून आणला.
यापूर्वी नागपुरात तीन वेळा निवडून आल्याचा उल्लेख प्ररंभीच करून मुत्तेमवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी कुठलाही आरोप नव्हता. प्रचारही उत्तम झाला. कार्यकर्त्यांची प्रचारातील संख्याही मोठी होती. वस्ती-वस्तीत लोक हार घालून, हात दाखवून प्रतिसाद देत होते. निकालाच्या दिवशी सकाळी जो-तो ‘काहीच भीती नाही’, उत्तर नागपूर काँग्रेसचा गड आहे, अपनाही आमदार है, तीस हजार आरामसे निकल जायेंगे, पूर्व नागपुरात सतीशबाबू संभालेंगे, सत्तर हजार तो कही गये नही, पश्चिम नागपूरमे राजेंद्र मुळक है, एक लाख तो हैही, असे कार्यकर्ते सांगत होते. दुपारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर तर दक्षिणमे चालीस हजारसे आगे है वगैरे लोक सांगत होते. प्रत्यक्ष निकाल लागला तेव्हा दुकान साफ झालेले होते. आपल्याच माणसांनी करून टाकले. आम्हा दिल्लीवाल्यांचे हे हाल झाले.. आता मुंबईवाल्यांची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये सामुदायिक नेतृत्व आहे, असे म्हटले जात असताना निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात केवळ ‘हम दो हमारे दो’ असेच सुरू होते’, असे मुत्तेमवार मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे पाहत म्हणाले. आम्ही रस्त्यावर आलो आहोतच, आता तुमची वेळ आहे, असा इशारा द्यायलाही मुत्तेमवार विसरले नाहीत.
नेत्यांमध्ये संवेदनशीलता असावी. पक्षापेक्षा पदांवर प्रेम केले जात आहे. काँग्रेसमध्ये बेईमान जन्माला येऊ लागले आहेत. ‘अ‍ॅप्रोचिएबल लीडरशीप’ हवी. पद सोडा, पण पत सांभाळा, या शब्दात वसंत पुरके यांनी मनातल्या असंतोषला वाट मोकळी करून दिली. बंडू सावरबांधे यांच्या धडाडत्या तोफेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. नेते हवेत उडत होते. दिल्लीत मंत्रीच काय खासदारही भेटायला तयार नव्हते. उमेदवार निवडीतही गडबड झाली. युवक काँग्रेस वगैरे उपशाखाही संपल्या आहेत. नेते इंग्रजीत बोलतात, सामान्य कार्यकर्त्यांंशी मराठीत तर बोला. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले आहे. तेव्हा कार्यकर्त्यांना ताकद द्या, असे सावरबांधे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा