मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी नागपुरात केवळ चार तासात ३२५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले. मात्र, त्यापैकी केवळ ताजबाग सौंदर्यीकरणाच्या कार्यक्रमातच खासदार विलास मुत्तेमवारांनी हजेरी लावली. पक्षांतर्गत गटबाजीतून या नाराजीचा स्फोट झाल्याचे समजते.  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचे भूमिपूजन उत्तर नागपुरात झाले. नागपूर सुधार प्रन्यासने उभारलेल्या या केंद्रासाठी महाराष्ट्र शासनाकडून २२ कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १२० कोटी रुपये अपेक्षित असून हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करावयाचा आहे. व्हरायटी चौकात ६२३.९८ चौरस मीटर जागेवरील बहुमजली कार पार्किंग प्लाझा व व्यापार संकुलाचे उद्घाटन झाले. विकासकाने यासाठी ३ लाख रुपये खर्च केले आहेत. भामटी येथे नासुप्रच्या ३ एकर जागेवर महात्मा फुले क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले. यासाठी २.२० कोटी रुपये यासाठी खर्च झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री नितीन राऊत, वित्त व उर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व अनीस अहमद आदींसह काँग्रेसच्या इतर नेत्यांनी या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली असली तरी ताजबागचा कार्यक्रम सोडल्यास इतर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मुत्तेमवार यांनी टाळल्याने चर्चेला धुमारे फुटले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन आणि लोकर्पण समारंभाच्या कार्यक्रम पत्रिकेत  खासदार विलास मुत्तेमवार यांचे नाव होते. नागपुरातील रखडलेले विकास प्रकल्प आणि विदर्भाच्या मुद्दय़ावर मुत्तेमवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी ताजबागच्या कार्यक्रमात विकास प्रकल्पांच्या मुद्दय़ावर खडेबोल सुनावण्यासही कमी केले नाही. मेट्रोच्या रखडलेल्या प्रकल्पावरही त्यांची नाराजी प्रकट झाली.
गेल्या महिन्यात खासदार विलास मुत्तेमवार यांनी दिल्लीतील वजन वापरून रेल्वे राज्यमंत्र्यांना नागपुरात आणले. मोतीबागमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर रोहयोमंत्री नितीन राऊत यांनी तेथून जवळच असलेल्या त्यांच्या घरी बळेबळे रेल्वे राज्यमंत्र्यांना नेले आणि त्यांचा छोटेखानी सत्कारही केला. मुळात हा कार्यक्रम ठरलेला नव्हता. मुत्तेमवार गटातील कार्यकर्त्यांनी त्यानंतर खाजगीत बरीच आगपाखड केली होती. जिल्हा विकास नियोजनात विश्वासात घेतले जात नसल्याचा राग मुत्तेमवार गटाने आळवला होता. स्वतंत्र विदर्भाऐवजी विदर्भाचा विकास अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने मुत्तेमवार गटातही असंतोष आहे. ताजबाग कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त असल्याने इतर कार्यक्रमाला जाता आले नाही, असे मुत्तेमवार गटातून सांगितले जाते.

Story img Loader