पश्चिम नागपूरची उमेदवारी कोणाला मिळणार यावरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या दोन बडय़ा नेत्यांमध्ये प्रतिष्ठेची लढत सुरू असताना त्यात एकाने बाजी मारली तर दुसऱ्याचा पराभव झाल्यामुळे काँग्रेस वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. हे दोन नेते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार.
काँग्रेसचे हे दोन्ही नेते विदर्भात सभा संमेलनाच्यावेळी किंवा काँग्रेसच्या बैठकीत एकत्र येत असले तरी त्यांच्यामध्ये विळा-भोपळ्याचे नाते असल्याचे अनेकदा दिसून येत होते. तीन महिन्यांपूर्वी नागपूरला झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुत्तेमवार यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या दोन्ही नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले होते. विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित होताच पश्चिम नागपूरची उमेदवारी कोणाला मिळेल याकडे कार्यकत्यार्ंसह त्या भागातील मतदारांचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे निष्ठावंत समर्थक विकास ठाकरे या दोघांनी पश्चिम नागपूरवर दावा करून त्यांनी तयारी सुरू केली होती. राजेंद्र मुळक गेल्या सहा महिन्यांपासून मतदारसंघात कामाला लागल्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल असे वाटले होते, त्यामुळे विकास ठाकरे अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी त्यादरम्यान किमान सात ते आठ वेळा मुंबई-दिल्लीच्या चकरा मारल्या. विलास मुत्तेमवार दिल्लीमध्ये ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्यामुळे ते तळ ठोकून बसले होते. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून मुळक यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे दोन बडय़ा नेत्यांमध्ये प्रतिष्ठेची लढाई होती. विकास ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना आणि त्यांच्या गॉडफादरला यश येत नव्हते. ठाकरे यांच्याकडे शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे त्यांचे शहरात महत्त्व वाढले होते त्याचाच फायदा घेत कार्यकर्त्यांंचे संघटन मजबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
राजेंद्र मुळक विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांना यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची असल्यामुळे त्यांनी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू करून तशी वरिष्ठांकडे मागणी केली होती. सहा महिन्यांपासून काम सुरू केले होते. मात्र, अखेर बुधवारी रात्री जाहीर झालेल्या यादीत पश्चिम नागपुरातून मुळक यांना डच्चू देत विकास ठाकरे यांचे नाव जाहीर करण्यात आल्यामुळे मुत्तेमवार समर्थकांमध्ये आनंदाचे तर मुळक समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मुत्तेमवार यांचे दुसरे खंदे समर्थक दीनानाथ पडोळे दक्षिण नागपूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पडोळे यांच्याविरोधात मुत्तेमवार यांचा नाराजीचा सूर असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुत्तेमवार फारसे इच्छुक नसल्याची माहिती मिळाली. उमेदवारी मिळविण्याच्या दोन बडय़ा नेत्यांच्या लढतीमध्ये तूर्तास मुत्तेमवार जिंकले आणि चव्हाण हरले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा