शहरी भागात लिहिण्यासारखे काही उरलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातूनच सकस आणि दर्जेदार साहित्य निर्माण होत आहे. शहरातील विद्वानांनी त्याचा अभ्यास करावा. त्यासाठी आपली विद्वत्ता उपयोगात आणावी, असे सांगत कविता हीच माझी भूमिका असल्याचे मत तिसऱ्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय-पळसप यांच्या विद्यमाने दिवंगत आमदार वसंत काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते. यावेळी खासदार रजनीताई पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार सतीश चव्हाण, डॉ. सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे, भास्कर चंदनशिव, शुभांगी काळे, अनिल काळे व संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. भालेराव म्हणाले, पुरुषाला स्त्री झाल्याखेरीज लिहिता येत नाही. नवनिर्मिती करण्याचे काम केवळ स्त्रीच करू शकते. जात्यावरच्या ओव्या हे त्याचेच द्योतक आहे. जात्यावरच्या ओव्या हे मराठी साहित्यातील सर्वात मोठे धन आहे. तर या ओव्यांना जन्म घालणारे ‘जाते’ विद्यापीठाहूनही मोठे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण साहित्य संमेलनाची परंपरा मधल्या काळात खंडित झाली होती. अनेक ग्रामीण साहित्यिकांचे स्वप्न आमदार काळे यांच्या रुपाने साकारले जात असल्यामुळे त्यांनी काळे यांचे अभिनंदन केले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तोडीचे संमेलन ग्रामीण भागात होत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
दिवंगत आमदार वसंत काळे यांनी महाराष्ट्रात त्यांच्या विचाराची एक फळी निर्माण केली आहे. ती वसंत सेनाच आज हे काम करीत असल्यामुळे हे संमेलन अन्य संमेलनापेक्षा काकणभर सरस असल्याचे ते म्हणाले. समाजात संभ्रमावस्था निर्माण झाल्यानंतर साहित्य आणि साहित्यिक ठाम भूमिका घेऊन तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतात. अलिकडच्या काळात ठाम आणि पारदर्शी भूमिका घेणाऱ्या साहित्यकृती आणि साहित्यिकांकडे प्रसारमाध्यमे लक्ष देत नसल्याची खंतही प्रा. भालेराव यांनी व्यक्त केली.
या वेळी बोलताना खासदार रजनीताई पाटील म्हणाल्या, मागासलेपण दूर नव्हे, तर झटकून टाकायचे आहे. मराठवाडय़ातील पाणी प्रश्नासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकीय अभिनिवेष बाजूला टाकून एकत्रित यावे. मराठवाडय़ातील साहित्य आणि साहित्यिकही त्याची पाठराखण करतील. हा धागा पकडून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कृष्णा खोऱ्यातील पाणीप्रश्न नव्याने समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. कृष्णा खोऱ्याला ६६६ टीएमसी पाणी देण्याचा ठराव झाला आहे. त्यातील ४० टीएमसी पाणी मराठवाडय़ाच्या वाटय़ाला येईल. तसे झाल्यास पाच लाख एकर जमीन शाश्वत सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी लढा अधिक तीव्र करावा लागेल. मराठवाडय़ातील नेत्यांनी एकत्रित येऊन लढा द्यावा, असे ते देखील म्हणाले.
ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी मोबाईल, लॅपटॉप बाळगण्याच्या काळात पुस्तक बाळगणाऱ्यांविषयी प्रतिष्ठा वाढीस लागायला हवी. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. आमदार विक्रम काळे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन बबन माळी यांनी केले.
दर्जेदार आणि सकस साहित्याचा केंद्रबिंदू खेडेच – इंद्रजित भालेराव
शहरी भागात लिहिण्यासारखे काही उरलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातूनच सकस आणि दर्जेदार साहित्य निर्माण होत आहे. शहरातील विद्वानांनी त्याचा अभ्यास करावा. त्यासाठी आपली विद्वत्ता उपयोगात आणावी, असे सांगत कविता हीच माझी भूमिका असल्याचे मत तिसऱ्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा
First published on: 03-02-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Village is centre of qualitative and fertile literature indrajit bhalerao