तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या मातब्बर राजकीय नेत्यांच्या प्रभावक्षेत्रातील अकरा ग्रामपंचायतींची उद्या (रविवार) निवडणूक होत आहे. विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे नेत्यांनी निवडणुकीत पुर्वीसारखा रंग भरला नसुन केवळ गावगाडय़ातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावलेली ही निवडणूक ठरली आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रनाथ थोरात, अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात या राष्ट्रवादीच्या तर माजी सभापती आबासाहेब थोरात या काँग्रेस नेत्यांच्या उक्कलगाव पंचायतीच्या १३ जागांसाठी सरळ लढत होत आहे.
अशोक कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे यांच्या उंदिरगाव ग्रामपंचायतीतही निवडणूक होत आहे. प्रतिस्पर्धी राजेंद्र पाऊलबुद्धे व दिलीप गलांडे हे कडवी झुंज देत आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर यांच्या गुजरवाडी गावात निवडणूक होत असून ते आपला प्रभाव टिकवण्यात यशस्वी होतील अशी चिन्हे आहेत.
काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जी. के. पाटील व पंचायत समितीचे सदस्य किशोर पाटील यांच्या शिरसगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे गणेश मुद्गुले यांनी आव्हान उभे केले आहे. शहरालगत हे गाव असल्याने व्यापारी व भुमाफिया या निवडणुकीत सक्रीय आहेत.
भैरवनाथनगर व दत्तनगर हा शहराचाच भाग असुन ससाणे यांनी दोन स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना केली. दत्तनगरला ससाणे यांचा प्रभाव आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. तर भैरवनाथनगरमध्ये मुरकुटेंचा शिरकाव होणार नाही याची दक्षता ते घेत आहेत. भोकर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ससाणे यांच्या गटात मोठी फूट पडली. अनेक नेते मुरकुटे गटाला जाऊन मिळाले.
माळवाडगाव ग्रामपंचायतीत डॉ. नितीन आसणे यांनी मोठय़ा प्रमाणात विधायक कामे केली. मात्र त्यांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावण्यासाठी गिरीधर आसणे, शेखर आसणे व बाबासाहेब चिडे हे एकवटले आहेत. फत्याबाद, खिर्डी व निमगाव खैरी येथील निवडणुकातही चुरस आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा