आमगाव तालुक्याच्या भजीयापार येथील होणाऱ्या भूसुरूंग स्फोटामुळे बसणाऱ्या जबर हादऱ्यांमुळे भजीयापार, चिरचाळबांध व बुराडीटोला हे तीन गावे दहशतीत आहेत. येथील स्फोटामुळे गावकऱ्यांना दररोज हादरे बसत आहेत. त्यामुळे गावातील विहिरी बुजत असून घरे पडण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गावात होणाऱ्या अवैध गौण खनिजाची चोरी बंद करण्यासाठी नागरिकांनी एल्गार पुकारला आहे.
आमगाव तालुक्याच्या भजीयापार येथील साझा क्र. ०९ अंतर्गत गट क्र. ११३ आराजी १२.०३ हेक्टर आर ही नसर्गिक पहाडीची जमीन गावकऱ्यांच्या वहिवाटीसाठी उपयोगाची आहे, परंतु या पहाडीवर गौण खनिज उत्खनन करण्याचे कार्य २००७ मध्ये शहरातील व्यावसायिकांनी सुरू केले. त्या वेळेस ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र २०१२ पर्यंतच्या मुदतीचे देण्यात आले होते, परंतु १५ ऑगस्ट २०१० च्या ग्रामसभेत ठराव क्र.१३-०४ वर सरकारी जमिनीत गौण खनिज उत्खननासाठी मंजुरी न देण्याबाबत ११५ सदस्यांनी ठराव मंजूर केला होता. त्यानंतर १५ जुल २०१२ ला विशेष ग्रामसभा बोलावून गौण खनिज उत्खननासाठी कोणत्याच प्रकारची मंजुरी देण्यात येऊ नये, यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर १५ फेब्रुवारी २०१३ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून गौण खनिज उत्खननासाठी मंजुरी देण्यात येऊ नये, असा ठराव मंजूर केला होता. १५ ऑगस्ट २०१३ च्या ग्रामसभेत या गौण खनिजाच्या उत्खननासाठी ग्रामसभेत विषय नसताना सरपंच, उपसरपंच व सचिवाने ग्रामसभेच्या अध्यक्षाला माहीत न करता कामकाज पुस्तिका घरी नेली व आर्थिक देवाण-घेवाण करून त्यांनी उत्खननासाठी परवानगीचे ना हरकत ठराव त्या पुस्तिकेत लिहिले.
गेल्या ३१ जानेवारी २०१३ ला गौण खनिज उत्खननासाठी लिज देण्यात येऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना २९ जानेवारीला आमगावच्या तहसीलदारास निवेदन देण्यात आले. २३ सप्टेंबर २०१३ ला तहसीलदार व जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लिजची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
या पहाडी भजियापार येथील नागरिकांच्या वहिवाटीसाठी असल्याने या पहाडीचे उत्खनन सुरू असल्याने शेतकऱ्यांनी आपले जनावरे चारावी कुठे, हा बिकट प्रश्न उपस्थित झाला आहे. या पहाडीवर उत्खननासाठी ज्यांना परवानगी देण्यात आली ते मोठय़ा प्रमाणात स्फोट करीत असल्याने १०० फूट खड्डय़ातील दगड फुटत आहेत व  भजियापार व चिरचाळबांध येथील घरांना विहिरींना जबर हादरे बसत आहेत. जेसीपीच्या माध्यमातून या ठिकाणी ५० फूट खोल खोदकाम करण्यात आले. या पहाडीवर रात्रंदिवस यंत्राचा आवाज होत असल्याने ध्वनी प्रदूषणही होत आहे. सोबतच यंत्रांमुळे उडणारे रेतीचे कण शेतातील पिकांवर जात असल्याने पिकांनाही मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे.
या पहाडीवरील उत्खननामुळे भजियापार, चिरचाळबांध, बुराडीटोला या गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु त्यांनी साधी चौकशी न केल्यामुळे नागरिकांनी उत्खनन विभागाच्या आयुक्तांकडे    तक्रार   केली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केरून तीव्रआंदोलनाचा इशारा ही दिला आहे.
ग्रामसभेतील ठरावापासून अध्यक्षच अनभिज्ञ
भजियापार येथील १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत गौण खनिज उत्खननासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय ठेवण्यात आलेला नव्हता. ग्रामसभेतील ठेवलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली, परंतु गौण खनिजाचा विषय नसताना सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाने या विषयासंदर्भात ग्रामसभेच्या अध्यक्षालाही न कळविता गौण खनिज उत्खननासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत ठराव स्वत:च नमूद करून घेतला. गावातील १९० लोक ग्रामसभेला उपस्थित असताना एकाही व्यक्तीला या विषयाची माहिती नाही, परंतु सरपंच, उपसरपंच व सचिवाने हे कृत्य केल्यामुळे नागरिक असंतोष व्यक्त करीत आहेत. ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांवर ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Story img Loader