गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. या मालेतील नववा लेख.
ग्रामीण भागात वाडी, वस्त्यांवर पडणारे दरोडे आणि गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात ५५२ ग्राम सुरक्षा दलांची स्थापन झाली असून गावागावांतील असामाजिक तत्त्वांवरही त्यांच्यामार्फत बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. या दलामुळे पोलीस यंत्रणेला अतिरिक्त कुमकही उपलब्ध झाली आहे.
गावपातळीवरील वाद सामोपचाराने मिटविणे आणि नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबविणे असे या मोहिमेचे स्वरूप आहे. त्या अनुषंगाने तंटे मिटविणे, सार्वजनिक सणोत्सव शांततेने साजरा करणे, धार्मिक सलोखा निर्माण करणे, सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे संरक्षण, अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे, सामाजिक सुरक्षितता, राजकीय सामंजस्य निर्माण करणे, गावातील अनिष्ट प्रथा रोखणे अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांवर प्रत्येक गावाचे मूल्यमापन करण्यात येते. त्याअंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत करणेही अभिप्रेत आहे. ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे, सदस्यांना गणवेश व प्रशिक्षण देणे, ग्राम सुरक्षा दलाची रात्रगस्त सुरू करणे या निकषानुसार गुणांकनही केले जाते. नंदुरबार जिल्ह्यातील ५०१ गावांनी यंदा या मोहिमेत सहभाग नोंदविला असून त्यांच्यामार्फत ५५२ ग्रामसुरक्षा दलांची स्थापन झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. या दलाच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला अतिरिक्त कुमक मिळाली, शिवाय ग्रामीण भागात घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांची माहिती मिळविण्याचा स्रोतही उपलब्ध झाल्याचे दृष्टिपथास पडते.
ग्रामीण भागात चोरी व दरोडय़ाच्या घटना रोखण्यासाठी या दलाच्या सदस्यांकडून गस्त घातली जाते. याद्वारे स्थानिक पातळीवर सुरक्षा व्यवस्थेची फळी उभारली गेल्याने पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताणही काही अंशी हलका झाला आहे. रात्रीच्या सुमारास गस्त घालून दरोडय़ांना अटकाव करण्याची जबाबदारी या दलावर सोपविण्यात आली आहे. त्याकरिता पोलीस यंत्रणेकडून दलातील सदस्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. एवढेच नव्हे तर, गणवेश उपलब्ध करून दिले जातात. खास प्रशिक्षण व गणवेश यामुळे दलाच्या सदस्यांमध्ये गावाची सुरक्षितता ही भावना रुजण्यास चालना मिळाली. यामुळे बहुतेक सदस्य केवळ रात्रीच गस्त घालण्याची आपली जबाबदारी नसून एकूणच गावातील शांततेला बाधक ठरणारे, तंटय़ांना कारणीभूत ठरणाऱ्या संबंधितांवर लक्ष ठेवण्याची भूमिकाही पार पाडत आहे. ग्राम सुरक्षा दलात प्रामुख्याने युवकांचा सहभाग आहे. कामधंदा नसल्याने शहरांप्रमाणे गावातही बेरोजगार युवकांची संख्या मोठी असते. युवकांची ही स्थिती तंटय़ांचे अनेकदा कारण ठरते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी अशा युवकांनी ग्राम सुरक्षा दलात सक्रीय व्हावे, याकरिता प्रयत्न केले. त्यास चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसत आहे. या दलाच्या मदतीने गावातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यास पोलीस यंत्रणेला अतिरिक्त बळ उपलब्ध झाले. तसेच नैसर्गिक आपत्ती  वा  आपत्कालीन प्रसंगात हे दल स्थानिक पातळीवर लगेच कार्यरत होऊ शकते.