आचारसंहिता लागू होण्याच्या मार्गावर असताना सोमवारी गोवर्धन शिवारात घाईघाईत करण्यात आलेल्या नाशिक कलाग्रामच्या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामस्थांच्या विरोधाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या ठरावाला न जुमानता पोलिसी बळाचा वापर करून दंडेलशाहीने ही जागा ताब्यात घेतल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन यांचा सपाटा लावला आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या दिवशीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही धडपड सुरू होती. त्या अंतर्गत गोवर्धन शिवारात ‘नाशिक कलाग्राम’चे बुधवारी सकाळी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खा. समीर भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कलाग्रामसाठी ही जागा देण्यास स्थानिक ग्रामस्थांनी सातत्याने विरोध दर्शविला आहे. या कार्यक्रमावरही त्याचे सावट असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्थानिक ग्रामस्थांनी या सोहळ्यास विरोध दर्शवून पालकमंत्री व खासदार महोदयांकडे निवेदनाद्वारे आपले म्हणणे मांडले. दिल्ली हाटच्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या बाजाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक कायमची बाजारपेठ या माध्यमातून साकारण्याचे नियोजन आहे. परंतु, ही बाब गोवर्धनच्या विकासाला मारक ठरणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामपंचायत अनेक वर्षांपासून ही जागा क्रिडांगण, व्यायामशाळा, वाचनालयासाठी द्यावी म्हणून मागणी करत आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने ठरावही केला आहे. परंतु, शासन व प्रशासनाने दंडेलशाहीच्या मार्गाने ही जागा ताब्यात घेतल्याचा आरोप प्रमोद जाधव, नरेंद्र जाधव, दत्तू डंबाळे आदींनी केला. गोवर्धन गावाने आजवर अनेक शासकीय उपक्रमांसाठी जागा देऊनही स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला नाही. कलाग्राममध्ये स्थानिकांना रोजगार मिळेल याबाबत काय निर्णय घेतला, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

Story img Loader