जामखेड तालुक्यातील चौंडी येथे सीना नदीपात्रात वाळू माफिया व त्यांच्या वाहनांवर ग्रामस्थांनी हल्ला करून त्यांना पिटाळून लावले या हल्ल्यामध्ये वाहनांचे सुमारे २० लाख रूपयांचे नुकसान झाले. संबंधित ठेकेदार कर्जतच्या हद्दीतदेखील वाळू चोरत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
श्रीगोंदे तालुक्यातील कौठा येथील ओम साई सॅन्ड सप्लायर्स या कंपनीने चौंडी शिवारातील सिना नदीपात्रात वाळू उपसा करण्याच्या ठेका घेतला आहे. ट्रक, ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या साहाय्याने वाळूउपसा सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक वाळू येथून उपसण्यात आली आहे. हा उपसा बंद करा अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र त्याची संबंधितांना दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनीच आक्रमक पवित्रा घेतला. तो लक्षात घेऊन या ठेकेदाराच्या लोकांनी गाडया सोडून पळ काढला. ग्रामस्थांनी वाहनांचा ताबा घेतला. वाळू ठेकेदार प्रवीण ढगे यांनी ग्रास्थांविरूध्द जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार ३० ते ३२ ग्रामस्थांवर गुन्हा आला आह़े  मात्र ग्रामस्थ काही झाले तरी चालेल मात्र वाळूउपसा करू देणार नाही अशी ग्रामस्थांची भुमिका आहे
दरम्यान हा वाळू ठेकेदार कर्जत तालुक्याच्या हद्दीतही वाळूउपसा करीत आहे. रात्री मजूर लावून वाळू काढावयाची व पुन्हा जेसाबीच्या सहाय्याने खड्डे बुजवण्याचे काम करीत आहेत अशी तक्रार कर्जत तालुक्यातील चापडगाव व दिघी परीसरातील प्रकाश शिंदे, पंकज राऊत यांच्यासह अनेकांनी केली असून चापडगाव येथील ग्रामस्थही या वाळुमाफीयांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते असे समजते.

Story img Loader