उरण तालुक्यातील भेंडखळ गावी साडेबारा टक्के योजनेतील भूखंड वितरणासाठी गेलेल्या सिडकोच्या टीमला ग्रामस्थांनी मंगळवारी अक्षरश: हुसकावून लावले. सिडकोच्या साडेबारा टक्के अंमलबजावणी विभागातील अधिकारी गाडय़ांचा ताफा व मोठय़ा लवाजम्यासह भेंडखळ गावी भूखंड वितरणासाठी गेले होते. अनधिकृत बांधकामांचे या टीमने मोजमाप सुरू केल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापले होते.
सिडकोला साडेबारा टक्के योजनेअंर्तगत प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करावयाचे आहे. ही योजना ९० टक्के पूर्ण झाली आहे असा सिडकोचा दावा आहे. पनवेल, उरण तालुक्यातील अनेक गावे अजून या योजनेपासून अलिप्त राहिलेले आहेत. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी आलेल्या व्ही. राधा यांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी ‘सिडको आपल्या दारी’ योजना सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी सिडकोच्या साडेबारा टक्के विभागातील मुख्य भूमी व भूमापन अधिकारी संभाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी संगणक, बोयोमेट्रिक मशिनसह भेंडखळ गावातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पोहोचले. या योजनेअंर्तगत गावात २५ हेक्टर जमीन वितरित करावयाची आहे पण सिडकोकडे केवळ सात हेक्टर जमीन शिल्लक आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना गावापासून दूर इतरत्र जमीन दिली जाणार आहे. त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. या गावाजवळील शेकडो हेक्टर जमीन सिडकोने विशेष आर्थिक क्षेत्रासाठी संपादित केली असून ती रिलायन्सला विकली आहे. त्यामुळे सिडकोजवळची ही जमीन ग्रामस्थांना देऊ शकत नाही. रिलायन्सला एसईझेडसाठी पेण तालुक्यातील जमीन न मिळाल्याने रिलायन्सचा हा प्रकल्प सध्या बारगळला आहे. त्यामुळे ती जमीन तशीच मोकळी आहे. सिडको या जमिनीचा उपयोग करू शकत नाही आणि प्रकल्पग्रस्तांना ही जमीन देता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. त्यात सरकारने साडेबारा टक्के योजनेतील लाभार्थीचे अनधिकृत बांधकाम त्यांना मिळणाऱ्या भूखंडातून वगळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम वळते करण्याचा प्रश्न येत नाही. तरीही सिडकोच्या टीमने भेंडखळ गावातील अनधिकृत बांधकामे मोजण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सिडकोच्या टीमला गाशा गुंडाळण्यास भाग पडले. या टीममध्ये काही प्रकल्पग्रस्त अधिकारी होते. त्यांनी सिडकोची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकून न घेता सिडकोची वकिली करू नका, असा सज्जड दम ग्रामस्थांनी दिला.
सिडकोच्या साडेबारा टक्के टीमला ग्रामस्थांनी हुसकावले
उरण तालुक्यातील भेंडखळ गावी साडेबारा टक्के योजनेतील भूखंड वितरणासाठी गेलेल्या सिडकोच्या टीमला ग्रामस्थांनी मंगळवारी अक्षरश: हुसकावून लावले. सिडकोच्या साडेबारा टक्के अंमलबजावणी विभागातील अधिकारी गाडय़ांचा ताफा व मोठय़ा लवाजम्यासह भेंडखळ गावी भूखंड वितरणासाठी गेले होते.
First published on: 17-07-2013 at 08:55 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers expels cidcos 12 percent team