नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने ५ महिलांचा बळी घेतल्यानंतर या परिसरातील १२ गावात दहशत निर्माण झालेली आहे. एका वाघाला पकडण्यासाठी १० शार्पशुटरची चमू, २२ मोटारगाडय़ांचा ताफा, ९० बंदूकधारी व १५० वन व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात येणारी वाघ शोधमोहीम सपशेल अपयशी झाली असून या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न थिटे पडल्यानंतर तेथील गावकऱ्यांनी आपल्या परीने नवीनच शक्कल लढवून आता जंगलात म्हशींना साडी नेसवून बांधून ठेवलेले आहे. या प्रयोगातून तरी वाघ महिला समजून या म्हशींवर ताव मारेल आणि तो वनाधिकाऱ्यांच्या कचाटय़ात सापडले असे समजून आपल्या पाळीव जनावरांचाही जीव धोक्यात टाकलेला आहे.
माणूस वाचला पाहिजे म्हणून केलेल्या या प्रयोगाने हा वाघ आता तरी तावडीत येणार, अशी आशा येथील गावकऱ्यांना वाटत आहे. नवेगावबांध परिसरातील भिवखिडकी येथील काही शेतकऱ्यांनी ही शक्कल लढविली आहे. १० दिवसांपूर्वी शेवटच्या महिलेचा बळी घेतल्यानंतर अशी जबरदस्त मोहीम राबवून सुद्धा वाघाचा मागमूस अद्याप तरी लागलेला नाही. जंगलात म्हैस चारताना कुणीतरी महिलाच सरपणाची लाकडे तोडत अथवा काम करीत आहे, असा समज वाघाचा होईल आणि त्याला जेरबंद किंवा बेशुद्ध किंवा जीवे मारणे सोयीचे होईल, असा येथील गावकऱ्यांचा होरा आहे.
वनविभागातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाघ परतीच्या प्रवासाला लागला, अशी आशा असली तरी गावकऱ्यांचा अद्याप या समजावर विश्वास नाही. त्यांचा जीव मुठीतच आहे.
आता तरी ही शक्कल कामी येऊन वाघाच्या तावडीतून कायम भयमुक्त होऊ, अशी आशा या परिसरातील गावकऱ्यांना लागली आहे. १५० कर्मचाऱ्यांच्या चमूंची शोधमोहीम, तसेच यावर दररोज होणारा १ लाखाचा खर्च, त्यांची जंगलातील धावपळ, शेकडो वाहनांची पेट्रोिलग, तसेच वनविभागाची कागदोपत्री होणारे नियोजन आदी बरेच प्रयत्न गावकऱ्यांनी आतापर्यंत बघितले, पण वाघाची ही दहशत एकदाची संपवलेली बरी, या उद्देशाने आता गावकऱ्यांनीच प्रयत्न सुरू केलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा