भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक अलीकडेच येथील मयूर लॉनमध्ये पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गजांची नावे असली तरी, पक्षश्रेष्ठींनी या पदाची जबाबदारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या खांद्यावर टाकली.
ही निवडणूक या ना त्या कारणाने पुढे ढकलण्यात आली. या पदासाठी अनेक दिग्गजांची नावे असल्याने गेले तीन महिन्यांपासून भाजपसह सर्वच राजकीय पक्षाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. दरम्यान, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पक्ष संघटन व निवडणूक तयारीसाठी जिल्हा भाजमध्ये नवीन जिल्हाध्यक्षपदावर घेऊन मंथन सुरू होते. या पदाच्या शर्यतीत विद्यमान जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आमदार केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे यांची नावे पुढे होती. गेल्या पंधरवडय़ात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष कोण होणार, याबद्दल तर्कवितर्क केले जात होते. दरम्यान, गुरुवारी मजूर लॉनमध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी विनोद अग्रवाल यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घातली. यावेळी आमदार डॉ. खुशाल बोपचे, आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार केशवराव मानकर, भेरसिंग नागपुरे, दयाराम कापगते, हेमंत पटले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी आणि कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या निवडणुकीनंतर भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला असला, तरी काहींच्या चेहऱ्यावर नाराजीची छटाही पहायला मिळाली. दरम्यान, जातीय समीकरणाचे महत्व लक्षात घेऊन आपल्या गटातील व्यक्तीची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागावी, अशी प्रत्येक गटाची इच्छा होती. त्यामुळे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांसमोर पक्ष संघटनेसोबतच आगामी निवडणुकीचे मोठे आव्हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा