मुंब्रा व कोकणातील अपघातांची वेळीच दखल घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विदर्भातील अतिवृष्टीशी काही देणे घेणे नाही. अतिवृष्टीत काँग्रेस आघाडी सरकार पूर्णत: नापास झाले आहे. मदतीचा आव आणत एकीकडे अल्प पॅकेज जाहीर करायचे आणि सत्तेच्या मस्तीतून पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांवर लाठीमार करायचा. अशा शेतकरीविरोधी सरकारला सत्तामुक्त करण्याचे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी केले.
अतिवृष्टीनंतर तावडे यांनी ब्रम्हपुरी, चिमूर व चंद्रपूर तालुक्याचा दौरा करून पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विदर्भातील शेतकरी व पूरग्रस्तांमध्ये काँग्रेस आघाडी सरकारविरोधात प्रचंड असंतोष असल्याची माहिती दिली. पूर ओसरल्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत ठोस मदतीची घोषणा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांची मदत पूरग्रस्तांपर्यंत अजूनही पोहोचलीच नसल्याचे त्यांनी या वेळी सबळ पुराव्यानिशी दाखवून दिले.
रहमतनगर या वस्तीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात २४०० पूरग्रस्तांची नोंद घेण्यात आली आणि मदतीचे धनादेश केवळ १२० लोकांनाच वाटप करण्यात आले. यावरूनच मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्तांना मदतीची घोषणा किती फोल आहे, हे स्पष्टपणे दिसून येते, असेही ते म्हणाले. पावसाळी अधिवेशनाच्या काळातच अतिवृष्टी आल्याने विदर्भातील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दौऱ्या करण्याची सूचना केली होती. परंतु, विदर्भाच्या बाबतीत नेहमीच तिटकारा असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी श्रेय भाजप-शिवसेनेला मिळू नये म्हणून दोन दिवसाच्या सुटीनंतर शनिवारी अतिवृष्टीग्रस्त भागाचा धावता दौरा केला. त्यामुळे पूरग्रस्त भयंकर संतापले असून लोकांचा सरकारकडून अपेक्षाभंग झाला आहे.
पूरग्रस्तांच्या मनात हा असंतोष खदखदत असतानाच पालकमंत्री संजय देवतळे यांनी शासनाने जाहीर केलेली मदत देण्याऐवजी केवळ पाहणी केली. त्यामुळे पूरग्रस्त संतापले आणि सरकारविरोधी याच संतापातून त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. पूरग्रस्तांच्या भावनेचा उद्रेक समजून घेत त्यांनी लोकांना शांत करणे गरजेचे असताना उलट पोलिसांच्या मदतीने लाठीमार केला. यात दहा ते बारा जण जखमी झाले. हा लाठीमार म्हणजे सत्तेच्या मस्तीतून पूरग्रस्तांच्या पोटावर केलला वार आहे. पुरातून सावरण्यापूर्वीच पूरग्रस्तांवर गुन्हे दाखल करणारे पालकमंत्री व काँग्रेस आघाडी सरकारला सत्तामुक्त करा. अतिवृष्टीमुळे विदर्भात प्रचंड नुकसान झाले असून त्याचा आवाका सरकारला अद्याप समजलेला नाही. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाचे काम सुरू केले असले तरी बहुतांश शेतकरी व पूरग्रस्तांची नावे यातून सुटली असल्याने पुनर्सर्वेक्षणाची मागणीही त्यांनी केली. स्थानिक अधिकारीही सर्वेक्षण योग्य पद्धतीने करीत नसल्याच्या तक्रारी मिळाल्या असून ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
गोसीखूर्द प्रकल्प वेळीच पूर्ण झाला असता तर आजची पूर परिस्थिती उद्भवली नसती. त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा तसेच जिल्ह्य़ातील नद्यांना संरक्षण भिंती बांधाव्यात. यासंदर्भात आपण स्वत: राज्यपालांची भेट घेऊन विषय मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पूरग्रस्तांवर लाठीमार करून दाखल केलेले गुन्हे व केसेस मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेला आमदार शोभा फडणवीस, खासदार हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष व आमदार प्रा.अतुल देशकर, आमदार नाना शामकुळे व भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते हजर होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा