जिल्ह्यात सुरू असलेल्या आ. रामप्रसाद बोर्डीकर-विजय भांबळे यांच्यातील सत्तासंघर्षांने आज हिंसक वळण घेतले. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर आता हा संघर्ष आणखी चिघळला आहे. आ. बोर्डीकर यांच्या विरोधात दरोडय़ाचा तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या परस्परविरोधी गुन्ह्यानंतर हा संघर्ष भविष्यात आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.
शिवरामनगरातील निवासस्थानी काँग्रेसचे आ. रामप्रसाद बोर्डीकर व त्यांच्या गुंडांनी शनिवारच्या मध्यरात्रीनंतर सशस्त्र हल्ला केला अशी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर जवंजाळ यांनी दिल्यानंतर बोर्डीकरांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर बोर्डीकर समर्थक राम बापूराव कदम यांचे अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळेंसह चार जणांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
जवंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास आ. बोर्डीकर हे काही गुंडांना सोबत घेऊन आले. त्यांनी शिवरामनगरमधील आपल्या घराचा समोरील दरवाजा तोडला व आत घुसले. त्या वेळी आपण व आपले कुटुंबीय गाढ झोपेत होतो. हा गोंधळ ऐकल्यानंतर आपण जागे झालो. तेव्हा बोर्डीकर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उभे असल्याचे दिसले. त्यांच्या सोबतच्या गुंडांजवळ तलवारी व काठय़ा होत्या. हा प्रकार चालू असतानाच घराच्या मागच्या खोलीत आम्ही स्वत:ला कोंडून घेतले व खोलीतून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी आले. पोलिसांच्या वाहनाचा आवाज ऐकल्यानंतर बोर्डीकर व त्यांचे साथीदार घटनास्थळावरून पळाले. घटनास्थळीच बोर्डीकरांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले, असे जवंजाळ यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
गंगाधर जवंजाळ यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या या तक्रारीवरून आज रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आ. रामप्रसाद बोर्डीकर, सिद्धार्थ सुभाष साबळे, शिवाजी गणपती चौधरी, शेख अमीद शेख हमीद, िपटू चौधरी इतर ३० ते ३२ लोकांविरुद्ध कलम ३९५नुसार दरोडय़ाचा व अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सशस्त्र हल्ला करून घरातून सोनी कंपनीचा मोबाइल, एक लॅपटॉप व १८ हजार रुपये रोख, असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.  
आज राष्ट्रवादीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. स्वराजसिंह परिहार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. पोलीस वेळेवर पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा गंगाधर जवंजाळ व त्यांच्या कुटुंबीयांचा खून झाला असता, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जवंजाळ यांच्या घरावरील सशस्त्र हल्ल्यानंतर बोर्डीकर पुन्हा नवा मोंढा पोलीस ठाण्यात आले व त्यांनी पोलिसांसमोर जवंजाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असेही या निवेदनात म्हटले आहे. बोर्डीकर गुन्हा करून ठाण्यात आल्यानंतरही पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही, असा सवाल या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. जवंजाळ यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणात सर्व आरोपींना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बोर्डीकरांविरुद्ध दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पांडुरंग रामराव घाटूळ (रा. करवली, ता. जिंतूर) यांनी एक तक्रार दाखल केली. काल सायंकाळी पाच वाजता बोरी येथे शिवाजी चौधरी व विष्णू साहेबराव चौधरी यांच्यात भांडण होऊन मारहाण झाली होती. यात दोघेही जखमी झाल्याने त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. शिवाजीसोबत अंगद मुन्ना चौधरी, पांडुरंग घाटूळ हे होते तर राम कदम हेही दवाखान्यात पोहोचले. त्या वेळी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक एम.एच. २२-९१९२मधून भांबळे उतरले. त्यांनी राम कदम यास मारहाण करून कानपटीला पिस्तूल लावली. या गाडीत रामला टाकून भांबळेंसह जवंजाळ, भूमरे, अजय चौधरी फरार झाले, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, युवक प्रदेश सरचिटणीस अजय चौधरी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर जवंजाळ, राष्ट्रवादीचे परभणी तालुकाध्यक्ष सुरेश भूमरे या चार जणांविरुद्ध अपहरण, मारहाण व आर्म अॅक्ट ३/२५प्रमाणे नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आ. बोर्डीकर यांचे बंधू गंगाधर बोर्डीकर व जिल्हाभरातून बोर्डीकर समर्थक नानलपेठ पोलीस ठाण्यात आले होते. भांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर गंगाधर बोर्डीकर व समर्थक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. भांबळेंसह सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली.
दरम्यान, दरोडय़ाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धार्थ सुभाष साबळे यांनीही स्वतंत्रपणे जवंजाळ यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीत राम कदम यांचे अपहरण का केले अशी विचारणा करण्यासाठी आपण जवंजाळ यांच्या घरी रात्री गेलो असता गंगाधर व त्यांच्या पाच-सहा साथीदारांनी आपणास मारहाण करून खिशातील रोख रक्कम काढून घेऊन जातिवाचक शिवीगाळ केली, असे या तक्रारीत साबळे यांनी नमूद केले आहे. या तक्रारीवरून गंगाधर जवंजाळ यांच्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणखी दुसरा दरोडा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

Story img Loader