पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या संसर्गापासून मलेरियाची भीती व्यक्त करण्यात येत असली तरी पावसाळ्यापूर्वीच अनेक मुंबईकर विषाणूसंसर्गामुळे आजारी पडले आहेत. उन्हाचा ताप कमी करण्यासाठी ग्लासवर ग्लास रिचवले जाणारे थंडा थंडा कूल कूल सरबत आणि ताप थोडासा कमी झाल्याबरोबर कार्यालयात जाण्याची घाई यामुळे विषाणूसंसर्ग वाढण्यास मदत होत आहे.
मलेरिया, डेंग्यूमुळे ताप हा प्रकार पावसाळ्याशी जोडला गेला असला तरी हा आजार वर्षभर अस्तित्त्व टिकवून असतो. त्यातच ऋतुबदलाच्या काळात विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळत असल्याने ऑक्टोबर, फेब्रुवारी, मे महिन्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढते. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत त्याला बाहेरच्या खाण्याची व थंड सरबतांची जोड मिळाली असल्याने फॅमिली डॉक्टरांकडे तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विषाणूसंसर्गामुळे ताप येणे ही या काळातील सामान्य घटना आहे. मात्र सध्याच्या कामाच्या पद्धतीमुळे त्याचे प्रमाण वाढते. औषधे घेऊन थोडे बरे वाटले की कामावर या, अशी कंपनीकडून सूचना येते. कामावर जाताना बस, ट्रेन अशा गर्दीच्या ठिकाणी इतरांना विषाणूसंसर्ग होतो. तसेच एकाच कार्यालयात सेंट्रल एसीमध्ये आठ ते दहा तास एकत्र घालवताना विषाणूसंसर्गाची शक्यता तर वाढतेच शिवाय रुग्णाचाही आजार बळावतो, असे डॉ. सुहास साठय़े यांनी सांगितले. जेवण आणि झोप यांच्या वेळा सांभाळल्या आणि थोडा आराम केला तर हे आजार बरे होतात. मात्र जरा बरे वाटल्यावर औषधे अध्र्यावर बंद करण्याचीही सवय अनेकांना असते. त्यामुळे विषाणू पूर्णपणे नष्ट झाले नसल्याने पुढच्या आजारात अधिक तीव्रतेची औषधे घेण्याची वेळ येते, असेही डॉक्टरांकडून सांगितले गेले. मे महिन्याच्या सुरुवातीला तापाच्या रुग्णांची संख्या वाढली होती. काही वेळा दूषित पाणी व स्वच्छतेच्या सवयी नसल्याने ताप तसेच पोटदुखीचे रुग्ण येतात, असे नायर रुग्णालयाती औषधशास्त्र विभागातील डॉ. राकेश दाभाडे म्हणाले. डॉक्टरांकडे येणाऱ्या पोटदुखी तसेच तापाच्या बहुतांश रुग्णांमागे बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्याचा तसेच पूरेशी विश्रांती न घेतल्याची कारणे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा