प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या खाद्य पदार्थाच्या संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती महामंडळातर्फे ८०० पानांचा खाद्य पदार्थाचा कोश तयार करण्यात आला असून लवकरच त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा खाद्य संस्कृतीचा बायबल प्रथमच तयार केला जात असल्याची माहिती प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.
विष्णू मनोहर यांनी शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. वेगवेगळ्या राज्यांच्या खाद्य संस्कृतीविषयी त्या त्या प्रदेशात अनेक पुस्तके उपलब्ध असली तरी अनेकांना त्याची माहिती नसल्यामुळे अशा खाद्य पदार्थाची माहिती व त्या पदार्थाचा इतिहास या कोशमध्ये राहणार आहे. अनेक दिवसांपासून या कोशाचे काम सुरू आहे. हा कोश तयार करताना सुनंदा पाटील आणि अनुपमा उसगरे यांनी बरीच मेहनत घेतली आहे. साडेतीन हजार रेसिपींचा यामध्ये समावेश असून त्या प्रत्येक रेसिपीचा उगम कसा आणि कुठे झाला, कुठल्या राज्यात तो प्रचलित आहे, तो कसा तयार केला जातो या विषयांची माहिती त्यात राहणार आहे. अशा पद्धतीचा राज्य शासनाचा खाद्य संस्कृतीवर असलेला कोश प्रथमच तयार झाला असून दोन महिन्यांत तो बाजारात विक्रीसाठी येईल. हा कोश तयार करताना अनेक रेसिपीची माहिती चुकीची होती त्यामुळे त्यातील प्रत्येक पदार्थाची सत्यता पडताळून पाहण्यात आली आहे.
राज्य शासनाचा खाद्यकोश तयार झाला असताना मी स्वत: गेल्या सहा वर्षांपासून २२ हजार रेसिपी असलेला कोश तयार करीत आहे. आतापर्यंत तीन हजारच्या जवळपास रेसिपींचा त्यात समावेश करण्यात आला. वेगवेगळ्या राज्यांतील खाद्य पदार्थ आणि तो तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री याचा त्यात समावेश आहे. जुन्या काळातील किंवा पारंपरिक खाद्य पदार्थांकडे नव्या पिढीतील महिलांचा ओढा वाढत आहे. पूर्वी चाळीच्यावर असलेल्या महिला या रेसिपीच्या कार्यक्रमात सहभागी होत, मात्र आता नव्या पिढीतील युवती रेसिपीच्या शोमध्ये सहभागी होत असतात. खाद्य पदार्थांचा कल बदलत असला तरी पारंपरिक पदार्थांकडे आजही नव्या पिढीचा ओढा आहे.
अनेक पारंपरिक पदार्थांची नवीन पिढीला माहिती नाही. त्यामुळे अशा रेसिपीच्या कार्यक्रमातून ती दिली जाते. विशेषत: हिंदी भाषक महिलांचा सहभाग जास्त असतो. काही पदार्थांना जुना इतिहास आहे. आज त्यातील अनेक पदाथार्ंची नावे बदलली आहेत. पुण्यामध्ये आयटी विभागातील एका कार्यालयात रेसिपीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला केवळ दहा महिला उपस्थित होत्या. त्यामुळे दहा महिलांसमोर कार्यक्रम कसा करायचा, असा प्रश्न पडला. मात्र, तो केल्यानंतर अनेक महिलांनी माझ्याशी संवाद साधला. प्रत्यक्ष त्या कार्यक्रमात १० महिला सहभागी असल्या आपल्या कक्षात बसून त्या हा शो पाहात होत्या. खाद्य संस्कृती हायटेक होऊ लागली आहे. त्याचे उत्तम उदाहरण त्यावेळी बघायला मिळाले.
घरोघरी सिलिंडर आले असले तरी ग्रामीण भागात आजही चूल प्रचलित असून त्यावरच स्वयंपाक केला जातो. चुलीवर तयार केलेला पदार्थ आणि गॅसवर तयार केलेला पदार्थ यात फरक जाणवतो. त्याची चव वेगळी असते. शिवाय चुलीमधील निखारे बाहेर काढून त्यावर भांडे ठेवले की ते गरम राहते. शहरातील अनेक भागात आजही चुलीवर स्वयंपाक तयार केला जातो. आपल्याकडील खाद्य संस्कृती वेगळी असून ती अन्य राज्यात प्रचलित होत आहे. विविध वहिन्यांवर आतापर्यंत साडेतीन हजारापेक्षा अधिक रेसिपीचे शो करण्यात आले आहेत. शिवाय खाद्य संस्कृतीवर २८ पुस्तकांची निर्मिती करण्यात आली असून १८ पुस्तकांचे काम सुरू आहे.
ऑक्टोबरमध्ये दुबईला जहाजावर मेजवानी असा कार्यक्रम करणार असल्याचे मनोहर यांनी सांगितले.
वाचकांना लवकरच मराठी खाद्यकोशाची मेजवानी
प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या खाद्य पदार्थाच्या संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाच्या साहित्य व संस्कृती महामंडळातर्फे ८०० पानांचा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-04-2015 at 12:56 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnu manohar visit loksatta office