विश्व साहित्य संमेलन म्हणजे परदेशवारीसाठी केलेले ढोंग असून हे ‘विश्व’ नव्हे तर ‘फसवे’ साहित्य संमेलन आहे अशी जोरदार टीका लेखक, कवी आणि आकाशवाणीचे निर्माते डॉ. महेश केळुसकर यांनी ठाणे येथे केली. सरकारी पैशातून फिरायला जाणे हा एकच उद्देश या साहित्य संमेलनामध्ये आहे, असेही केळुसकर यांनी ठणकावून सांगितले. आचार्य अत्रे कट्टय़ावर आयोजित  मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
मराठी माणसांचे बेळगाव सीमावाद, मराठी शाळा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विश्व साहित्य संमेलनासारख्या फसव्या  संमेलनांनी हे प्रश्न सुटणार आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  शुभांगी वाघ यांनी विविध विषयांवर केळुसकर यांच्याशी संवाद साधला. चांगला निर्माता,निवेदक होण्यासाठी उच्चार, भाषेवर मेहनत घेणे आवश्यक आहे. निवेदकाचा क्रियापदांचा उच्चार नेहमीच स्पष्ट असायलाच हवा असे त्यांनी सांगितले. निवेदक होण्यासाठी प्रसिद्ध निवेदकांचा अभ्यास केल्याचे ते म्हणाले. ३० वर्षांच्या आकाशवाणीतील नोकरीतील नऊ वर्षे रत्नागिरीत काम केले. यावेळी ‘आकाशवाणी तुमच्या दारी’ कार्यक्रमानिमित्ताने रत्नागिरी पिंजून काढल. यावेळी लोकांच्या अनेक समस्यांचे निराकरण करून दिले. लोकांसाठी उपयुक्त काम करू शकतो याचे खूप समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आणीबाणीप्रसंगी टी.व्ही आणि इतर संपर्काची यंत्रणा बंद असताना आकाशवाणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करता आल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
१९९३ मध्ये ‘वाईकर भटजी’ मालिका आठ वेळा तर विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या  ‘महानायक’ कादंबरीवरील ‘महानायक’ मालिका ११ वेळा पुनर्प्रक्षेपित केली. या मालिकेसाठी १ लाख १० हजार रुपये खर्च आला आणि नंतर २५ लाख रुपयांचा नफा आकाशवाणीला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ही मालिका लोकांच्या अद्याप स्मारणात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
लवकरच प्रकाशित होणाऱ्या ‘जोर की लगी हे यार’ हा कथासंग्रहातील गोष्टी मुंबईत कामगारांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. या कथासंग्रहाच्या निमित्ताने सामान्य माणासाचे जीवन जवळून पाहताना बऱ्याच वेळा मन हळवे झाले, पण लेखकाला तटस्थ आणि कणखर राहता येणेही तितकेच महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी केळुसकर यांनी आपल्या ‘मोर’ या निसर्ग कवितासंग्रहातील निवडक कवितांचे वाचन केले.