गंगापूर तालुक्यातील देवळी व सुलतानाबाद येथील जळालेल्या मोसंबीच्या बागा, तसेच कोरडय़ा पडलेल्या विहिरींची बुधवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली. फळबागा, चारा छावण्या, पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेची कामे याबाबतचा आढावा पथकाने घेतला. पथकाचे सहसचिव संजीव चोप्रा, उपसचिव प्रदीप इंदुलकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी विविध समस्यांची माहिती केंद्रीय पथकाला दिली.
गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी व लासूर स्टेशन येथील चारा छावणीची पथकाने पाहणी केली. चारा छावण्यांचे व्यवस्थापन व शेतकऱ्यांच्या मागण्या याची माहिती त्यांनी घेतली. जनावरांना लागणारा चारा, उपलब्धता व दर याचे गणितही सदस्यांसमोर मांडण्यात आले. गंगापूर तालुक्यातील देवळी, सुलतानाबाद येथे जळालेल्या मोसंबी बागांना भेट दिल्यानंतर दाहेगाव मध्यम या पूर्ण कोरडय़ा पडलेल्या प्रकल्पाची पाहणीही सदस्यांनी केली.
टंचाई स्थितीत रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे सुरू करावीत, फळबागा वाचविण्यास कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची माहिती पोहोचवावी अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी या वेळी दिल्या.
जिल्ह्य़ात २०१ गावे व ५ वाडय़ांमध्ये ५५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ४०८ गावांमधील ५३९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यात ३ व वैजापूर तालुक्यात १ चारा छावणी सुरू करण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या ९० कामांवर १ हजार ७५२ मजूर काम करत असल्याची माहिती केंद्रीय पथकाच्या सदस्यांना देण्यात आली.
मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्य़ांतही केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी केली. या सदस्यांच्या शिफारशींवर केंद्राकडून राज्य सरकारला मदत मिळणार आहे. खरीप हंगामात ७७८ कोटींची मदत राज्यास करण्यात आली होती. या वेळी फळबागा व पिकांचे नुकसान मोठे असल्याने केंद्राकडून मोठय़ा प्रमाणात निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बुधवारी पाहणीच्या वेळी जिल्हाधिकारी विक्रम कुमार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे, उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, तहसीलदार रुपेश शिंगारे आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय पथकाकडून मराठवाडय़ात दुष्काळाची पाहणी
गंगापूर तालुक्यातील देवळी व सुलतानाबाद येथील जळालेल्या मोसंबीच्या बागा, तसेच कोरडय़ा पडलेल्या विहिरींची बुधवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली. फळबागा, चारा छावण्या, पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेची कामे याबाबतचा आढावा पथकाने घेतला.
First published on: 28-02-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Visit by centrel team in marathwada