रेल्वेत ओळख झाल्यानंतर दोन वर्षांपासून केवळ भ्रमणध्वनीवर आयुष्यभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेणाऱ्या एका प्रेमकथेचा अवघ्या काही क्षणात नाटय़मय शेवट झाला. सामाजिक भान ठेवून वजिराबाद पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणात महत्त्वाची भूमिका पार पडल्याने एक अनर्थ टळल्याचे मानले जाते.
गुजरात राज्यातील एका २१वर्षीय युवतीची नांदेडच्या देगलूर नाका परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी रेल्वेत ओळख झाली होती. ओळखीनंतर या दोघांचा भ्रमणध्वनीवर संवाद होत होता. मध्यंतरीच्या काळात या दोघांची एकदा मनमाड रेल्वेस्थानकावर भेट झाली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्धार केला. वर्षभरापूर्वी झालेला हा निर्धार पूर्ण होईल या अपेक्षेत ती तरुणी होती. दोन वर्षांपासून वेगवेगळय़ा सणाला शुभेच्छा देत या दोघांनीही भावी आयुष्याचे स्वप्न रंगवले होते. दोघांच्या संमतीनंतर लग्नाचा मुहूर्तही निश्चित झाला. लग्नमुहूर्त सात-आठ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अचानक नांदेडच्या तरुणाने आपला भ्रमणध्वनी बंद केला. भ्रमणध्वनी बंद असल्याने त्या तरुणाच्या प्रेमात पडलेली तरुणी गुजरातहून थेट नांदेडात दाखल झाली. वजिराबादचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांची भेट घेऊन त्या तरुणीने आपली कैफियत मांडली. माझी संबंधित तरुणाशी भेट घालून द्या, आमचे आज लग्न आहे, असे साकडे तिने घातल्यानंतर निकाळजे यांनी प्रारंभी तिची समजूत काढली. एकीकडे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे यांच्या पथकाला त्या तरुणाचा शोध घेण्याचे सांगण्यात आले, तर दुसरीकडे पोलीस उपनिरीक्षक अर्चना चव्हाण यांना त्या तरुणीचे समुपदेशन करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रेमवीराने दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध मोठय़ा चतुराईने घेतला. स्वत:चा चिखलवाडी भागातला पत्ता सांगणारा तरुण देगलूर नाका परिसरात राहात होता.
पोलिसांनी त्या तरुणाला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तरुणीने सुटकेचा नि:श्वास सोडला. आपला विवाह होईल, या आशेवर असलेल्या तरुणीचा भ्रमनिरास झाला. प्रेमवीराने विवाह करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्यानंतर गुजरातहून आलेल्या त्या तरुणीचे अवसानच गळाले. आपल्या आयुष्यात आता काही राहिले नाही, आपली फसवणूक झाल्याचे सांगताना त्या तरुणीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. अखेर सामाजिक भान ठेवून वजिराबाद पोलिसांनी तिची समजूत काढली. तिच्या नातेवाइकांशी संपर्क केला व तिचा पाहुणचार करून तिला गुजरातला पाठवले. विशेष म्हणजे त्या तरुणीने जाता जाता पोलिसांचे आभार मानताना नांदेडच्या तरुणालाही माफ करण्याचा मोठेपणा दाखवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा