कोल्हापूर जिल्हय़ाच्या राजकीय पटलावर लक्षवेधी ठरलेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल चोपडे यांनी तब्बल अडीच हजार मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार विलास गाताडे यांचा धक्कादायकरीत्या पराभव केला. चोपडे यांना ६६४७ तर गाताडे यांना ३९४७ मते मिळाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी जाहीर केले.     
जहाँगीर पटेकरी यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्याने प्रभाक ३ क मध्ये पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. १५७११ पैकी ६७.५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याने बाजी कोण मारणार याकडे लक्ष वेधले होते. आज मतमोजणीच्या वेळी तिन्हीही फेऱ्यांमध्ये चोपडे यांनी चढत्या क्रमाने मताधिक्य प्राप्त केले. नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी हे एकत्रित असले तरी पोटनिवडणुकीत ते आमनेसामने होते. पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या शहर विकास आघाडीने चोपडे यांना पाठिंबा दिला होता.
निकालानंतर आरोप-प्रत्यारोपाची राळ उठली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मदन कारंडे यांनी यापुढे आवाडेविरोधात सर्व निवडणुका शहर विकास आघाडीच्या सोबतीने लढवणार असल्याचे सांगितले. तर विठ्ठल चोपडे यांनी धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय झाल्याचे मत नोंदवले. पैशाचा वारेमाप वापर करूनही जनता काय निर्णय घेते याचा बोध आवाडे यांनी घ्यावा, असा शेरा त्यांनी मारला. शहर विकास आघाडीचे गटनेते जयवंत लायकर यांनी प्रकाश आवाडेंनी राजकीय संन्यास घेण्याची मागणी केली. सागर चाळके यांनी आवाडे गटाची पैशाची मस्ती जनतेने उतरवल्याचे नमूद केले. प्रकाश आवाडे यांनी पोटनिवडणुकीच्या निकालाने जनतेत काँग्रेसबद्दल असलेली नाराजी दिसून आल्याचे नमूद करून पक्षआत्मचिंतन करून नव्याने उभारणी करण्याचा मनोदय व्यक्त केला. पराभूत उमेदवार गाताडे यांनी जनतेचा कौल शिरसावंद्य असल्याचे सांगितले.