बुद्धीचा अनोखा संगम, रेषेवरून धावणारे रोबो आणि मशीनमध्ये गुंतलेली मुले असे चित्र रविवारी आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये रंगले होते. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटक आदी राज्यांतून आलेले सुमारे ७०० विद्यार्थी येथे पार पडलेल्या विभागीय स्पर्धेत सहभागी झाले होते.
आशिया खंडातील सर्वात मोठा तंत्रज्ञान महोत्सव म्हणून ओळख असलेल्या आयआयटी मुंबईतील ‘टेकफेस्ट’मध्ये सहभागी होणे हे प्रत्येक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न साकारण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी येथे होणाऱ्या स्पर्धामध्ये सहभागी होतात. यासाठी देशभरातील विविध विभागांमध्ये विभागीय स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धा घेतल्यानंतर यातील विजेत्यांना जानेवारीत होणाऱ्या अंतिम स्पध्रेत सहभागी होण्याची संधी मिळते. रविवारी पश्चिम विभागाची प्राथमिक फेरी पार पडली. यामध्ये लाइन फॉलोइंग, मॅकॅनिकल आणि प्रोग्रामिंग अशा तीन स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये लाइन फॉलोइंग आणि मॅकॅनिकलमध्ये वीर जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेने बाजी मारली, तर प्रोग्रामिंगमध्ये आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. लाइन फॉलोइंगमध्ये तयार केलेल्या रोबोंना तेथे स्पध्रेसाठी देण्यात आलेल्या लाइनवरून चालवण्याचे काम टीमला करावयाचे असते. यातील विजेत्याला ‘ग्रीड वॉरिअर’ असा खिताब देण्यात येतो. तर मॅकॅनिकलमध्ये रोबोला विविध अडथळे पार करावे लागतात. यामध्ये १०० हून अधिक टीम सहभागी झाल्या होत्या. तर प्रोग्रामिंग स्पध्रेत विद्यार्थ्यांंना एक कोडिंगचा प्रश्न दिला जातो. हा प्रश्न त्यांना दिलेल्या वेळेत सोडवून त्यावर उत्तर सांगायचे असते. जो संघ हे वेळेवर पूर्ण करेल त्याला विजेता घोषित करण्यात येते. आता अशीच विभागीय स्पर्धा नॉएडा, इंदूर, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा