मुंबईच्या लोकल प्रवासादरम्यान दरवर्षी दगावणाऱ्या सुमारे चार हजार व्यक्तींपैकी ७० ते ८० टक्के व्यक्ती या रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातात दगावतात. रेल्वे अपघाताचे हे मूळ नष्ट करण्यासाठी माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थे’च्या सिव्हील इंजिनीअरिंग विभागाच्या दुसऱ्या वर्षांचे विद्यार्थी सरसावले आहेत. आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून अपघात टाळण्याबरोबरच रेल्वेच्या प्रश्नांवर तोडगा सुचविण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे. हार्बर मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोड स्टेशनप्रमाणे रेल्वेच्या पूर्व, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील सर्व स्थानकेच उंचावर बांधण्याची योजना विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात आखण्यात आली आहे. ‘रेल्वे रिव्हॅम्प’ नामक प्रकल्प हा ६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संस्थेच्या ‘टेक्नोव्हॅन्झा’ नामक आंतरमहाविद्यालयीन तंत्रज्ञान महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. विविध प्रश्नांवर तोडगा सुचविणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित २०हून अधिक प्रकल्प या महोत्सवात मांडण्यात येणार आहेत.
मुंबईच्या तिन्ही मार्गावरील लोकल प्रवासात २०१० साली ३ हजार ७१० व्यक्ती दगावल्या. यापैकी २ हजार १५२ व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडताना दगावल्या होत्या. २०११ साली ही आकडेवारी अनुक्रमे ३ हजार ४५८ आणि २ हजार २३ अशी होती. म्हणजेच धावत्या रेल्वेतून पडणे किंवा रेल्वेचा धक्का लागणे या अपघाताच्या अन्य कारणांपेक्षाही रूळ ओलांडताना होणारे अपघात जास्त भयावह आणि जीवघेणे आहेत. विद्यार्थ्यांनी या कारणावर लक्ष केंद्रीत करून सध्याच्या रेल्वे रूळांना समांतर अशी रेल्वे लाईन एलिव्हेट करण्याची योजना आखली आहे.
या एलिव्हेटेड मार्गावरून केवळ जलद मार्गाच्या रेल्वे धावतील. आणि खालच्या रेल्वे रूळांवरून धीम्या गतीच्या गाडय़ा जातील. मात्र त्यांची स्थानके वरच्या मजल्यावर असतील. ‘स्टेशनचे हे संपूर्ण स्ट्रक्चर सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाप्रमाणे स्टीलचे बनलेले असेल. त्यामुळे, स्टेशनच्या इमारतीचा भार हलका राहील. इमारतीचा भार हलका राहिल्याने जास्त वजन पेलणे शक्य होईल. तसेच, एलिव्हेटेड मार्गामुळे रेल्वे वाहतूक कमी होऊन गाडय़ांच्या फेऱ्या वाढविता येतील,’ असे हा प्रकल्प तयार करणाऱ्यांपैकी एक असलेल्या व्हीजेटीआयचा द्वितीय वर्षांचा विद्यार्थी व टेक्नोव्हॅन्झाचा कार्यक्रम प्रमुख जॉन मायकेल याने सांगितले.
वरच्या मार्गावरील रेल्वे रुळांमधील अंतर किमान एक मीटरचे असेल. त्यामुळे, वरचे रूळ ओलांडणे प्रवाशांना शक्य होणार नाही. परिणामी अपघातही कमी होतील, असा दावा त्याने केला. आयुष, चैतन्य, वैष्णवी, सुषमा, अमला, आशय आदी विद्यार्थ्यांचे सहकार्य त्याला या प्रकल्पाच्या मांडणीसाठी झाले.
मुंबईच्या रेल्वे यंत्रणेचा चेहरामोहरा आमूलाग्र बदलणाऱ्या या योजनेतून प्रत्येक रेल्वे स्टेशनची एलिव्हेट (उंचावर नेण्यासाठी) करण्यासाठी किमान २०० ते २५० कोटी खर्च अपेक्षित आहे. हा प्रचंड निधी कसा जमवायचा याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही योजनेत करण्यात आला आहे. कारण, प्रत्येक स्थानकाची इमारत ही बहुमजली असेल. उदाहरणार्थ दादर स्थानकावर या पद्धतीने २५ मजली तर अंधेरी स्थानकावर ३० मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. ही इमारत निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी देऊन स्थानकाच्या बांधणीसाठी लागणारा खर्च वसूल करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्थानकाची पाहणी करून तेथील मातीच्या प्रतीचा अभ्यास केला. त्यानंतर कुठल्या स्थानकार किती मजली इमारत बांधणे शक्य आहे, याचा आराखडा तयार केला.