पारंपरिक समज, प्रथा यातून निर्माण झालेल्या गरसमजूती आणि प्रसूतीसंबंधीचे अज्ञान यामुळे अनेकदा गर्भवती महिलांना स्वतच्या आणि बाळाच्या आरोग्याबाबत नेमके काय करायचे हेच समजत नाही. त्यामुळे समस्या निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी ‘अरमान’ या सामाजिक संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या गर्भवती, तसेच प्रसूती झालेल्या महिलांना ‘व्हॉइस कॉल’च्या माध्यमातून वेळोवेळी माहिती पुरवली जाणार आहे. ‘अरमान’ संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. अपर्णा हेगडे यांनी लो. टिळक रुग्णालयात २०११ मध्ये प्राथमिक पातळीवर ही सेवा सुरू केली होती. या रुग्णालयात येणाऱ्या महिला अशक्त असल्याने त्यांच्यासाठी लोह, तसेच पोषण आहाराची माहिती देण्यासाठी ही सुविधा होती. त्यानंतर उस्मानाबाद, वाशिम व सोलापूर जिल्ह्यात जानेवारीमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यानंतर आता लोकमान्य टिळक रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती व नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांसाठी ‘व्हॉइस कॉल’ सेवा देण्यात येत आहे. मूल एक वर्षांचे होईपर्यंत ही सुविधा देण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच हजार गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे. शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
दरम्यान, गर्भवती किंवा प्रसूती झालेल्या महिलांना आपल्या शंकाचे निरसन या माध्यमातून करता येणार नाही. मात्र तशी सुविधाही भविष्यात सुरू करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील. अरमान या संस्थेने जानेवारी २०१३ मध्ये उस्मानाबाद, सोलापूर आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील २५० गावांमध्ये ‘व्हॉइस कॉल’ सेवेच्या प्रकल्पासाठी मूलभूत पाहणी सुरू केली. ही पाहणी पूर्ण झाली असून पुढील तीन महिन्यात ११८० महिलांना ही सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
ही सेवा कशी असेल..
* गर्भवती महिलांनी मोबाइल किंवा लॅण्डलाइन क्रमांक देणे अपेक्षित. या क्रमांकावर दिवसातून कोणत्या वेळी कॉल करावा, त्याचीही माहिती घेतली जाईल.
* िहदी व मराठीत ‘व्हॉइस कॉल’ उपलब्ध
* गर्भवती असताना आठवडय़ातून दोन वेळा, प्रसूती झाल्यावर पहिल्या आठवडय़ात दररोज, तीन महिन्यानंतर आठवडय़ाला दोन, तर त्यानंतर आठवडय़ातून एकदा कॉल केला जाईल.
* अशा प्रकारे १४५ कॉलमधून गर्भवती महिलांनी घ्यायची काळजी, गर्भाची हालचाल, त्यावरून अंदाज, स्वतची काळजी, लसीकरण, डॉक्टरकडे जाण्याच्या वेळा,
गरसमजुती या संदर्भात माहिती पुरवली जाईल.
* प्रसूती झाली किंवा कॉल घेता आला नाही किंवा सेवा बंद करायची असल्यास संस्थेने दिलेल्या क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ द्यावा. त्यानंतर संस्थेकडून संपर्क साधून समस्या सोडवली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा