नामसाधम्र्याचा फायदा घेताना दुसऱ्याच्या प्रमाणपत्रावर तब्बल २३ वर्षे शिक्षकाची नोकरी केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. अंबड पोलिसांनी या बाबत एकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे आपले प्रमाणपत्र दुसऱ्याच्या स्वाधीन करणाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलडाणा जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा येथील रमेश लक्ष्मण केळकर हा डी. एड. उत्तीर्ण असला, तरी तो नांदेड जिल्ह्य़ातील पैनगंगा प्रकल्पात तांत्रिक सहायक म्हणून नोकरीस आहे. त्याने आपले डी. एड. प्रमाणपत्र नामसाधम्र्य असणाऱ्यास दिले. त्याआधारे जो डी. एड. उत्तीर्णच झाला नव्हता, त्याने २८ वर्षांपूर्वी, म्हणजे १९८५ मध्ये जालना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवली आणि तीन वर्षांपूर्वी (२००८) स्वेच्छानिवृत्तीही घेतली!
जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीदिनात या संदर्भात तक्रार आल्यानंतर जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने या बाबत चौकशीचे फर्मान दिले. नामसाधम्र्य असलेल्या या दोघांची जन्मतारीख व आजोबांची नावे वेगळी असल्याचे, तसेच दोघांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. अंबड पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध कदीम जालना पोलिसांनी फसवणूक करणे आणि अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voluntary retirement deploma service jalna