वाढती महागाई, देशाच्या संरक्षणाबाबत बोटचेपे धोरण, राजकीय स्वार्थासाठी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण यांसारख्या अनेक गोष्टींना सामान्य नागरिक कंटाळले असून त्यांना परिवर्तन हवे आहे. यासाठी ‘तात्कालिक कर्तव्य’ म्हणून येत्या निवडणुकीत राष्ट्रहिताचे धोरण असलेल्या पक्षाला निवडा आणि ‘शंभर टक्के मतदान करा’ असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी महोत्सव रविवारी रेशीमबाग मैदानावर साजरा करण्यात आला. या वेळी भागवत यांनी देशाशी संबंधित अनेक मुद्यांवर चिंता व्यक्त करत लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर लोकांना शंभर टक्के मतदानासाठी आवाहन करूनत्यांनी हिंदुत्ववादी विचाराच्या मतदारांना सूचक संदेश दिला. अलीकडच्या काळात बऱ्याच कालावधीनंतर संघाने अशी थेट राजकीय भूमिका घेतली आहे.
लोकशाहीत निवडणुका लढवणाऱ्यांसाठी निवडणूक हा राजकारणाचा विषय असला, तरी सामान्य नागरिकांसाठी निवडणूक हे राजकारण नाही, तर लोकशाहीने दिलेला आपला अनिवार्य हक्क बजावण्याची संधी आहे. अनेक नवीन आणि युवक मतदार होणार  आपले नाव मतदार यादीत योग्य प्रकारे समाविष्ट झाले आहे की नाही हे तपासून पाहण्याची सूचना मोहन भागवत यांनी केली.
शंभर टक्के मतदान होणे लोकशाहीच्या आरोग्यासाठी हितावह आहे. राजकीय पक्षांचे धोरण आणि उमेदवाराचे चारित्र्य यांचा विचार करा; तसेच भावनांच्या आहारी न जाता राष्ट्रहिताच्या धोरणानुसार चालणारा पक्ष आणि सक्षम उमेदवार पाहून मतदान करा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.
केवळ सत्तास्वार्थासाठी आंधळे होऊन आणि राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी सरकार देशहिताविरुद्ध कारवाया करीत असल्याचा आरोप करून सरसंघचालकांनी या संदर्भात मुजफ्फरनगरच्या दंगलींचे उदाहरण दिले. सत्तेच्या समीकरणातून या ठिकाणी विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या गुंडगिरीची केवळ उपेक्षाच करण्यात आली नाही, तर त्याला प्रोत्साहन आणि संरक्षण दिले. यातूनच कायदेशीर कर्तव्य बजावणाऱ्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला निलंबित केले, तसेच शांततेच्या मार्गाने निघणार असलेली अयोध्या परिक्रमा थांबवून व तिला वादग्रस्त बनवून खोटय़ा धर्मनिरपेक्षतेच्या आड सांप्रदायिक भावना भडकावण्याचा खेळ खेळला. कथित अल्पसंख्याक युवकांबाबत मवाळ भूमिका घेण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची सूचनादेखील तुष्टीकरणासाठी असल्याची टीका त्यांनी केली. जम्मूतील किश्तवाड येथे तर हिंदू व्यापाऱ्यांची दुकाने लुटण्याचे काम सांप्रदायिक विद्वेषाने प्रेरित झालेल्या गर्दीने राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत केले, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
चीन आणि पाकिस्तान करीत असलेल्या आगळिकीकडेही भागवत यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. भारताच्या सीमेत घुसखोरी करून, भारतीय बाजारपेठेत शिरकाव करून आणि भारताच्या चारही बाजूंच्या देशात आपला प्रभाव वाढवून चीन भारताचा अंदाज घेत आहे. यामागे त्याचे निश्चित धोरण असून त्याचा निर्धाराने मुकाबला करणे आवश्यक आहे. त्यासाठी चिनी वस्तूंचा बहिष्कार करावा आणि त्यात जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पाकिस्तानच्या सीमेवरील अतिक्रमण व घुसखोरीबाबत आम्ही मवाळ भूमिका घेतो म्हणून त्यांची हिंमत वाढते. भारतासारख्या सार्वभौम देशाने हे का सहन करावे? घुसखोरीबाबत बोटचेपे धोरण ठेवण्यामागेही राजकारणी लोकांचा मतांसाठीचा स्वार्थ असल्याचा आरोप त्यांनी केला.
दोन वर्षांपूर्वीपर्यंत भारत आर्थिक महासत्ता बनण्याबाबतची चर्चा होती. आता रुपयाची घसरण थांबवून आर्थिक संकटातून बाहेर पडू की  नाही हा चर्चेचा विषय आहे. किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीमुळे देशाच्या मिळकतीचा मोठा हिस्सा असलेल्या लघुउद्योजक आणि किरकोळ व्यापाऱ्यांची विदेशी भांडवलदारांशी विषम स्पर्धा होणार आहे. उच्चपदस्थांच्या आर्थिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांविरुद्ध जनतेमध्ये व्याप्त असंतोष आंदोलनांतून व्यक्त झाल्यानंतरही अशा प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत आहेत, अशी टीका मोहन भागवत यांनी केली.
व्यापारी वृत्तीतून चालणाऱ्या आजच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यात राहिलेले नाही, तसेच त्यात गुणवत्ता व संस्कार निर्माण होणेही बंद झाले आहे. त्यामुळे या धोरणात मूलभूत बदल करण्याच्या गरजेवर सरसंघचालकांनी भर दिला. विदेशी संस्थांना अनियंत्रित पद्धतीने आमंत्रण दिल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रच जणू विदेशी माणसांच्या हातात सोपवण्याची तयारी आम्ही केल्याचे जाणवत आहे. आपल्या कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व लक्षात न घेता वेगवेगळे अनावश्यक कायदे आणून कुटुंबातील व्यक्तींमधील संबंधही आर्थिक रूपात बदलावेत असा प्रयत्न सुरू आहे. आपल्या अहंकारापायी विकासाच्या चुकीच्या मार्गावर वाटचाल करण्याची किती मोठी शिक्षा निसर्ग देतो, हे उत्तरांचलमधील नैसर्गिक संकटात सर्वानी अनुभवले आहे. अर्थात या देशाचे नियम आणि व्यवस्था यांचे पालन करण्याची जितकी जबाबदारी शासनावर आहे, तितकेच या नियमांनुसार शिस्तीने वागण्याचे समाजाचे कर्तव्य आहे. यातूनच भ्रष्टाचारमुक्त सामाजिक जीवनाचा प्रारंभ होईल, अशी आशा सरसंघचालकांनी व्यक्त केली.
ज्याप्रमाणे सम्राट अशोकाने गांधारपासून दक्षिणेपर्यंत एक राज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे संघाने हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम केले आहे. नागपूर ही नागांची नव्हे, तर नायकांची व नेतृत्वाची भूमी आहे. शक्ती आणि भक्ती यांचा समन्वय साधूनच नवा भारत घडावा व त्यातून एक हजार वर्षांचा अंध:कार दूर होऊन देशाला परम वैभव प्राप्त व्हावे, अशी अपेक्षा प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक व विचारवंत आणि माजी खासदार लोकेशचंद्र यांनी या वेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी शारीरिक व घोष प्रात्यक्षिके सादर केली.
संघाचे महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सरकार्यवाह भैयाजी जोशी हे गेल्या अनेक वर्षांत प्रथमच या कार्यक्रमाला उपस्थित होते.
विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे व नागपूर महानगर सहसंघचालक लक्ष्मण पार्डीकर हेही व्यासपीठावर हजर होते. भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, महापौर अनिल सोले हे संघाच्या गणवेशात कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.