महाविद्यालयाचे महोत्सव म्हणजे मज्जा, मस्ती आणि धमाल एवढंच आपल्या डोळ्यासमोर येते. पण याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमही या माध्यमातून राबविले जात आहेत. मतदानाचे कमी प्रमाण, प्रामुख्याने सुशिक्षित वर्ग आणि तरुणांमध्ये राजकीय प्रक्रियेविषयी निर्माण झालेली चीड व मतदानाबाबतची उदासीनता लक्षात घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर देशाच्या जडणघडणीत असलेले निवडणुकीचे महत्त्व आणि त्यातही मतदानाचा अधिकार वापरण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आता महाविद्यालयांनीच पुढाकार घेतला असून महोत्सवांच्या माध्यमातून तरुण मतदारांच्या जागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
आपल्याला जर चांगले नेतृत्व हवे असेल तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले पाहिजे असे मत सर्वत्र व्यक्त होत असते. पण मतदानासाठी पुढे यावे म्हणून जागृतीचे प्रमाण मात्र त्या तुलनेत खूप कमी दिसते आहे. यंदा मात्र महाविद्यालयीन तरुणांनी या बाबतीत पुढाकार घेतला असून महाविद्यालयाच्या महोत्सवांमध्ये मज्जा, मस्ती, धम्माल याचबरोबर मतदानाचा प्रचार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम होणार आहे.
‘केसी कॉलेज’च्या माध्यम विभागाच्या ‘ब्लीटझर्कीन’ या महोत्सवाच्या निमित्ताने १९ नोव्हेंबर रोजी ‘१८+ वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे २०० विद्यार्थी सहभागी होणार असून मतदानाच्या हक्काबाबत जागृती निर्माण करण्यात येणार आहे.
हे प्रयत्न केवळ महाविद्यालयीन पातळीवरच सुरू आहेत असे नाही, तर राज्यातील विविध विद्यापीठाच्या माध्यमातूनही ही मोहीम सुरू आहे. महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे ही मोहीम राबवावी, अशी सूचना राज्याच्या एनएसएस विभागाचे प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी काढली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. निवडणूक आयोगाच्या पत्राचा आधार घेत महाविद्यालयांमध्ये ‘मेरा वोट मेरा हक’ ही मोहीम ऑगस्ट महिन्यात सुरू झाली. आतापर्यंत मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई, उपनगर, डहाणू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा विविध ठिकाणच्या १८८ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती पसरविण्यात आल्याचेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयांना मतदार यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून ती सादर करण्यासही सांगितले होते. यालाही महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच महाविद्यालयांनी या संदर्भात जागृतीचे विविध उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी सूचनाही करण्यात आल्याचे डॉ. साळुंखे म्हणले.
वांद्रे येथील रिझवी एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अशाच एका मोहिमे अंतर्गत कार्यक्रमात सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे यंदा निवडणुकांचे वातावरण राजकीय पक्षांनी तापवण्याआधीच महाविद्यालयांनी तरुणांना जागरूक आणि जबाबदार बनवण्याची मोहीम हाती घेतल्याचे चित्र आहे.

Story img Loader