नववर्ष स्वागतयात्रा मूलत: सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने सुरू झाल्या असल्या तरी पहिल्यापासूनच यात्रांनी प्रखर सामाजिक भान जपले आहे. त्यानुसार गोरेगावातील नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ‘मतदार जागृती’ अभियान राबविले जाणार आहे.
गोरेगावातील यात्रेत यापूर्वी स्त्रीभ्रूण हत्या, प्लॅस्टिक पिशव्यांचा भस्मासुर, पर्यावरण रक्षण आदी विषयांवर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले होते. यंदा निवडणुकांचे वर्ष आहे. एरवी सरकार, प्रशासन आणि राजकीय पक्षांवर टीका करणाऱ्यांनी किमान मतदानाचे कर्तव्य तरी बजावावे, हा संदेश या निमित्ताने स्वागत यात्रेतून देण्यात येणार आहे. यासाठी पथनाटय़े, गीते, चित्ररथ, बॅनर, पोस्टर आदी साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या यात्रेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात्रेचा समारोप हजारो सहभागींच्या सामूहिक संपूर्ण वंदे मातरम् गायनाने होणार आहे, अशी माहिती यात्रेचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक सुहास कबरे तसेच कार्यवाह निलेश शिगवण यांनी दिली.
ही यात्रा पश्चिम द्रुतगती मार्गावरील वनराई वसाहतीतून सकाळी ७.३० वाजता सुरू होणार असून आरे रस्त्यावरील दत्त मंदिर चौकात तिचा समारोप होईल. यात्रेत ध्वजपथके, लेझीम, युवक व युवतींचे ढोलपथक, साहसी खेळ, मनोरे, दुचाकीस्वार, पारंपरिक खेळ आदी प्रमुख आकर्षणे असणार आहेत.