शिवसेनेचा आक्षेप, तर राष्ट्रवादीतही अस्वस्थता
निवडणूक आयोगाने केलेल्या मतदार तपासणी मोहीमेनंतर ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मतदारसंघातील सुमारे चार लाख ७८ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असली तरी या मुद्दयावरुन जिल्ह्य़ातील राजकारणात नवे वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्य़ाधिकारी कार्यालयाने केलेल्या पुनर्तपासणी मोहीमेत ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या तीन मतदारसंघातील सुमारे दीड लाख मतदारांना कात्री लावण्यात आली असून कळवा-मुंब््रयाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच मीरा-भाईंदरचे गिल्बर्ट मेडोन्सा यांच्या मतदारसंघातील नावे मोठय़ा प्रमाणावर वगळली गेल्याने जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री गणेश नाईक यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नवी मुंबईत जेमतेम आठ हजार मतदारांची नावे वगळली गेली असून यामुळे ही अस्वस्थता आणखी वाढली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने ठाणे जिल्ह्य़ातील सुमारे २४ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची पुनर्तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहीमेनंतर जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मतदारसंघातील मतदारांची नवी आकडेवारी जाहीर करण्यात आली असून ठाणे लोकसभा मतदारसंघातील सुमारे एक लाख ६८ हजार तर पालघर लोकसभा मतदारसंघातील एक लाख ६२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आल्याने या दोन्ही मतदारसंघातील राजकीय समिकरणावर याचा परिणाम होईल का, अशास्वरुपाची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात सर्वाधीक ४८ हजार ६३५ मतदारांची नावे वगळण्यात आली असून कोपरी-पाचपाखाडी (३० हजार ५६८) आणि ओवळा-माजीवडा (३९ हजार २२८) या शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातून सुमारे मोठय़ा प्रमाणावर नावे वगळली गेल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रात ३९ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून याठिकाणी राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेडोंन्सा हे आमदार आहे. गुजराथी-मारवाडी मतदारांचा भरणा असलेल्या महापालिका प्रभागांमधून मोठय़ा प्रमाणावर नावे वगळली गेल्याचा आरोप शिवसेना नेते करु लागले आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या जिल्ह्य़ातील इतर आमदारांच्या मतदारसंघातही मोठय़ा प्रमाणावर नावे वगळली गेली आहेत. यामध्ये मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या मतदारसंघातील सुमारे २५ हजार तर जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील सुमारे ३२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. वसईचे अपक्ष आमदार विवेक पंडीत यांच्या मतदारसंघातील सुमारे ३४ हजार तर कॉग्रेसचे मंत्री राजेंद्र गावीत यांच्या पालघर मतदारसंघातील ३२ हजार नावे वगळली गेली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही तगडय़ा आमदारांच्या मतदारसंघातील दुबार नावांना मोठय़ा प्रमाणावर कात्री लावली जात असताना पालकमंत्री गणेश नाईक यांच्या बेलापूर मतदारसंघातील सात हजार ४७ तर संदीप नाईक यांच्या ऐरोली विधानसभा क्षेत्रातील जेमतेम दीड हजार नावे वगळली गेल्यामुळे सर्वपक्षीय आमदारांमधील अस्वस्थता आणखी वाढली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील सुमारे दीड लाख मतदारांची नावे वगळली जातात आणि आणि पालकमंत्र्यांच्या नवी मुंबईत जेमतेम १० हजार मतदार दुबार नोंदणीचे आढळतात यातच सर्वकाही आले, असा आक्षेप ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील बरीचशी नावे दुबार नोंदणीची असल्यामुळे वगळली गेली असली तरी काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नावे कापली गेली आहेत, असा आक्षेप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. सर्वपक्षीय आमदारांच्या मतदारसंघात अशी नावे कापली गेली आहेत, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा