‘नोटा’ अर्थात नापसंतीच्या बटणाची माहिती सर्वसामान्य मतदारांना व्हावी यासाठी प्रसार व प्रचार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्रोही संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना पत्रातून केली आहे. तुम्हाला उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’चा वापर करावा, असे आवाहन विद्रोही संघटनेने केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रात यंदा प्रथमच नोटा अर्थात नापसंतीच्या बटनाचा समावेश केला आहे. मात्र, मतदान यंत्रात नापसंतीच्या बटनाचा समावेश असल्याची माहिती सर्वसामान्य मतदारांना नाही. कारण निवडणूक आयोगाने या बटणाचा प्रचार म्हणावा तसा केलेला नाही. नोटाच्या बटनाची माहिती ही सर्व मतदारांना व्हायला हवी परंतु स्थानिक पातळीवर सुध्दा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत जनजागृती केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बटनाचा प्रचार करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विद्रोही संघटनेने डॉ. म्हैसेकर यांना केली आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीचे हंसराज अहीर, आपचे अ‍ॅड. वामनराव चटप, काँग्रेस आघाडीचे संजय देवतळे, अतुल अशोक मुनगीनवार, प्रमोद मंगरूजी सोरते, विनोद दीनानाथ मेश्राम, अशोक विठोबा खंडाळे, नामदेव माणिकराव शेडमाके, संजय नीळकंठ गावंडे, नंदकिशोर रंगारी, मो. इखलाक, प्रमोद सोरते, विनोद मेश्राम, पंकजकुमार शर्मा, नामदेव शेडमाके, नितीन पोहाणे, सिराज पठाण, रोशन घायवान व सिध्दार्थ राऊत यांचा समावेश आहे. सामान्य मतदारांना यातील एकही उमेदवार योग्य नाहीत नसेल अशा मतदारांनी नोटाच्या बटनाचा वापर करायचा आहे. त्यामुळे आम्हाला या बटनाच्या प्रचाराची परवानगी द्यावी, असे विद्रोही संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक घोडमारे तथा संचालक विजय गावंडे यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात आम्हाला उमेदवार पसंत नाही, अशा मतदारात जनजागृती करण्याकरिता, बटनाची माहिती समजावून सांगण्याकरिता, मतदार संघात प्रचाराकरिता सभा, कॉर्नर सभा, बॅनर पोस्टर, प्रवासाकरिता वाहन, वाहनावर प्रचाराकरिता स्पीकर, बिल्ले, इत्यादी साहित्याचा वापर करण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी स्वत: मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालय, बार असोसिएशन, प्राध्यापक कक्ष तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयात जाऊन प्रचार करीत आहेत. मतदान करा परंतु ज्यांना उमेदवार पसंत नसेल त्यांना नोटाच्या बटनाची माहिती सुध्दा करून देण्यात यावी, अशीही विनंती विद्रोही संघटनेने केली आहे.