लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही भागात मतदारांचा मतदानासाठी उत्साह दिसून आला. नव मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. असे असले तरी सकाळी अनेक मतदान केंद्रावर तुरळक मतदार दिसून येत होते. दुपारी अडीच ते तीननंतर मात्र मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे मतदान केंद्रावर झालेल्या गर्दीवरून दिसून येत होते. या मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५०.४८ टक्के मतदान झाले होते. काही मतदान केंद्रावरील एव्हीएम यंत्रे बिघडल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्यात. तर अनेक केंद्रात मतदान ओळखपत्र असताना यादीत मात्र नाव नसल्याचे दिसून आल्यानंतर मतदार आल्यापावली परत जात होते.
या मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. कुठेही गोंधळ उडाल्याचे अथवा तणाव निर्माण झाल्याचे वृत्त नव्हते. सर्वच मतदार केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली होती. तरुण-तरुणी शिस्तबद्धतेने मतदान करीत होते. पहिल्यांदाच मतदान करीत असल्याने नवमतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. परंतु त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नव्हता. तसेच देश कोणत्या मार्गाने जावा, देशाचे नेतृत्त्व कोणाच्या हातात गेले पाहिजे, हे स्वप्न त्यांच्या विचारातून दिसून येत होते. त्यांना ‘नोटा’चीही चांगली कल्पना होती. ग्रामीण भागात काही राजकीय पक्षांचे चिन्ह असलेले बॅनर झळकत होते, तर अनेक कार्यकर्ते गळ्यात दुपट्टे टाकून फिरत होते. त्यांच्या मनात आचारसंहितेची कुठलिही भीती दिसून येत नव्हती. अनेक मतदान केंद्रात अपंग, वयोवृद्ध नागरिकांनीही मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.
कामठीतील सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथमिक शाळेतील मतदान क्र. १०७ मध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १.६७ तर १०९ मध्ये ३.६७ टक्के मतदान झाले होते. कन्हान (पिपरी) येथील बीकेसीपी हायस्कूलमधील मतदान क्र. ३३६ मध्ये सकाळी ११.८८ टक्के मतदान झाले होते. या मतदान केंद्रावर आनंद बाबुलाल बागडे या अपंग मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला. याच मतदान केंद्रावर चिंतामन झडबा गोंडेकर या अपंग मतदाराने ओळखपत्र असतानाही यादीत नाव नसल्याने मतदान न करू शकल्याबद्दल खंत व्यक्त केली. ३३४ क्रमांकाच्या केंद्रात सकाळी ९ वाजेपर्यंत जवळपास २०.६७ टक्के मतदान झाले.
रामटेकातील राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील दोन मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजेपर्यंत १७.२५ टक्के मतदान झाले होते. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या हरदयाल कुछवाह, विश्वनाथ राघोजी तांदूळकर, शांताबाई चिंतूरकर यांनी मात्र मतदार यादीत नाव नसल्याची तक्रार केली. कमलाबाई चिमाभाई पटेल या ८० वर्षांच्या वृद्धेने मतदान केले. स्वातंत्र्यापासून जेवढय़ा निवडणुका झाल्यात, त्या त्या वेळी मतदान केले. परंतु देशाचा जो विकास व्हायला पाहिजे होता, तो न झाल्याबद्दल पत्रकारांजवळ खंत व्यक्त केली. रामटेकमधीलच समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील ७ मतदान मतदान केंद्रावर सकाळी ११ वाजर्पेयत सरासरी २२ टक्के मतदान झाले होते. क्षेत्रीय अधिकारी गीता वंजारी यांनी मतदान शांततेत होत असून पूर्वीपेक्षा मतदारांचा उत्साह अधिक दिसून येत असल्याचे पत्रकारांना सांगितले. येथील मतदान केंद्रावर ९५ वर्षीय वेणूबाई नागपुरे मुलाच्या सहायाने मतदानासाठी आल्या होत्या. परंतु मतदार यादीत नावच नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. कांद्री येथे एका उमेदवारांचे फलक लागलेले दिसून आले. पत्रकारांनी ही बाब नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या लाक्षात आणून दिली असता त्यांनी ते फलक पोलिसांकरवी काढून टाकले.
कांद्री येथील प्राथमिक शाळेतील चार मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत सरासरी २२ टक्के मतदान झाले होते. तर पारशिवनी येथील जिल्हा परिषद शाळेतील १६८ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ३१.१२ टक्के मतदान झाले होते. वरील दोन्ही मतदान केंद्रावर मतदारांची प्रचंड गर्दी दिसून आली. यामध्ये महिला मतदारांचा समावेश अधिक होता. सावनेर येथील न.प. सुभाष मराठी प्राथमिक शाळेतील चार मतदान केंद्रावर दुपारी ३ वाजर्पेयत सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते. धापेवाडा येथील कोलबास्वामी हायस्कूल येथील मतदान केंद्रावर दुपारी ४ पर्यंत ५९ टक्के मतदान झाले होते. या मतदार केंद्रात योगेश वसंतराव दिवाकर याने प्रथमच मतदानाचा अधिकार बजावला. मतदान करताना मनात कुठलाही गोंधळ नव्हता. तसेच नोटा या बटनचे महत्त्व माहीत असल्याचे सांगून त्याचा वापर करण्याची पाळी आली नसल्याचे स्पष्ट केले.
देशाचे नेतृत्त्व सक्षम व्यक्तीच्या हाती जावे, अशी भावना त्याने व्यक्त केली. तर कळमेश्वर येथील न.प. प्राथमिक शाळेतील चार मतदान केंद्रावर सरासरी ५५ टक्के मतदान झाले होते. येथील मतदान केंद्रावर मीनाक्षी कोल्हे या तरुणीने पहिल्यांदाच मतदान केले. देशाचा विकास व्हावा, असे मत तिने व्यक्त केले. याच मतदार संघातील आपचे उमेदवार प्रताप गोस्वामी यांनी नागपुरातील धरमपेठ महाविद्यालयात मतदानाचा अधिकार बजावला.
ग्रामीण भागांत दुपारनंतर मतदानाला वेग
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही भागात मतदारांचा मतदानासाठी उत्साह दिसून आला. नव मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-04-2014 at 03:32 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting speed increased after middy in rural areas