काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या सांगली महापालिका निवडणुकीसाठी उद्या (रविवारी) मतदान होत असून प्रचार थंडावल्यानंतर एकगठ्ठा मतांसाठी जोरदार फििल्डग लावण्यात नेते व उमेदवार गर्क होते. काहींनी रात्री घोडेबाजार गृहीत धरून आपल्या कामाचे नियोजन केल्याचे दिसून आले. अखेरच्या टप्प्यात ‘एक मत मला, दुसरे कोणालाही’ अशा पद्धतीच्या प्रचारामुळे क्रॉस व्होटिंगची शक्यता काही प्रभागात वर्तविण्यात येत होती.
आपआपल्या प्रभागात जास्तीत जास्त मतांची जुळणी करण्यात उमेदवार शनिवारी  दिवसभर मग्न झाले होते. एक गठ्ठा मते मिळविण्यासाठी एखादे मंडळ  हाताला लागते का? हे पाहण्यातच आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात उमेदवारांचा बहुतांशी वेळ जात होता. या शिवाय प्रभागात जातीची, भावकीची मते किती आहेत याचाही हिशोब आकडेवारीनुसार मांडण्यात काही मंडळी मग्न होती.
शहरातील काही ठिकाणी मतांचा बाजार मांडल्याची चर्चा आहे. एका मतासाठी ५०० रुपयांपासून १७०० रुपयांपर्यंत दर निघाला असल्याचे चौका-चौकात ऐकायला मिळत होते. मतदार यादीनुसार एका घरात किती मते आहेत ? याचा हिशोब मांडून त्याप्रमाणात दर निश्चित केला जात होता. निवडणूक प्रचार दरम्यान या देण्या-घेण्याला ‘मनीलाल’ हा नवीन शब्द प्रयोग वापरण्यात येऊ लागला आहे. म्हणून आज दिवसभर ‘मनीलाल पोहोचले का?’ अशा सांकेतिक भाषेत विचारणा केली जात होती.
महापालिका निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसची सूत्रे माजी मंत्री मदन पाटील यांच्याकडे तर राष्ट्रवादीची सूत्रे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आहेत. मदन पाटील यांच्या दृष्टीने ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. तर जयंत पाटील यांच्या दृष्टीने जिल्ह्याचे नेतृत्व घ्यायचे या दृष्टीने प्रतिष्ठेचे ठरली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन दोन्ही काँग्रेसने चुरशीने प्रचारात रंग भरला.
महापालिका इतिहासात पहिल्यांदाच राज्य पातळीवरील स्टार प्रचारकांनी मदानात हजेरी लावून मदान गाजविले. काँग्रेससाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. तर राष्ट्रवादीच्या बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री आर. आर. पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना मदानात उतरवून काँग्रेसला सडेतोड उत्तर द्यावे लागले.
मुंबईत राज्याची सत्ता चालविण्यासाठी मांडीला मांडी लावून बसणारी ही मंडळी सांगलीत आल्यानंतर मात्र एकमेकांची इरसाल भाषेत उणीदुणी काढत असल्याचे पाहून यांचे ‘बोलणं एक आणि करणं दुजं’ याची प्रचिती सर्वसामान्यांना आली.
महापौर इद्रिस नायकवडी यांनी विकास महाआघाडीच्या कार्यकालात अंतिम दीड वर्षांत आघाडीचे नेते जयंत पाटील यांनाच आव्हान दिल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे. मदान सुरू होण्यापूर्वीच महापौरांची दांडी उडाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात काही काळ आनंदोत्सव साजरा झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांची माघार घडवून आणून श्री. नायकवडी यांनी जयंत पाटलांना प्रतिशह दिला.
राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी असतानाही इलियास नायकवडी यांनी काँग्रेसच्या प्रचारात हिरिरीने भाग घेऊन पडद्यामागील गुपिते उघड करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या मदानात महापौरांच्या पत्नी आयेशा नायकवडी, पुत्र अतहर नायकवडी आणि प्रभाग ८ मध्ये सून वहिदा नायकवडी यांना पूर्ण ताकदीने उतरविले आहे. नव्या महापालिकेत नायकवडी नाव दिसणार नाही अशी भूमिका घेऊन ग्रामविकासमंत्री पाटील प्रचार करत आहेत. तर कोणत्याही स्थितीत तिघांनाही निवडून आणण्याचे आव्हान नायकवडी कुटुंबीयांनी स्वीकारले आहे.
दहा प्रभाग संवेदनशील
निवडणूक शांतते पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून १७०० कर्मचारी यासाठी तनात करण्यात आले आहेत. याशिवाय १५० कर्मचारी राखीव असून १५० कर्मचाऱ्यांचा फिरता बंदोबस्त राहणार आहे. याचबरोबर संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी १० व्हिडिओ कॅमेरे कार्यरत राहणार आहेत.
महापालिका क्षेत्रातील सांगली शहर ठाण्याच्या हद्दीतील प्रभाग १, १७, ३७,३८, विश्रामबाग हद्दीतील २२,३३,३४ आणि मिरज हद्दीतील २६,३० व ३१ असे दहा प्रभाग पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. बंदोबस्तासाठी राज्य राखीव दल आणि गृहरक्षक दल यांचेही साहाय्य घेण्यात येत आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून आज सकाळपासून केंद्रावरील कर्मचारी विशेष बसमधून साहित्यासह पोहोचविण्यात आले. शहरात मतदानावेळी प-पाहुण्यांकडून होणारा प्रचार आणि त्यातून होणारी वादावादी टाळण्यासाठी मतदारांव्यतिरिक्त बाहेरील गावांतील कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यासाठी शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर पोलिसांची गस्त ठेवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा